अन् कोरड्याठाक नद्या वाहू लागल्या !
By Admin | Updated: April 22, 2015 00:38 IST2015-04-22T00:34:40+5:302015-04-22T00:38:56+5:30
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद केनिया, नायझेरिया, युगान्डा आदी आफ्रिकी देशांमध्ये ग्रीनबेल्ट चळवळीच्या माध्यमातून पाणी-अन्नसुरक्षा-वृक्ष लागवड या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला.

अन् कोरड्याठाक नद्या वाहू लागल्या !
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद
केनिया, नायझेरिया, युगान्डा आदी आफ्रिकी देशांमध्ये ग्रीनबेल्ट चळवळीच्या माध्यमातून पाणी-अन्नसुरक्षा-वृक्ष लागवड या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला. बघताबघता ४० कोटी वृक्ष लागवड झाली. परिणाम म्हणून आफ्रिकी देशांतील कोरड्या पडलेल्या प्रमुख नद्या आज वाहत आहेत. यासोबतच आता ऊर्जा विषय हाती घेतल्याचे ‘ग्रीनबेल्ट’च्या डायरेक्टर वंजिरा मथाई यांनी सांगितले. त्या खास ‘लोकमत’शी बोलत होत्या.
आफ्रिकी देशांतील काही भागामध्ये वृक्षांचे अत्यल्प प्रमाण होते. त्यामुळे पर्जन्यमानही फारसे नसायचे. परिणामी या देशांतील गुऱ्हा, चायना, मलेरवा, युरेवा, नायरो आदी प्रमुख नद्या कोरड्या असायच्या. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दारिद्र्यामध्ये जगत असत. अन्न सुरक्षेचा प्रश्नही गंभीर होता. आणि पाणीप्रश्नाचा तर विचार न केलेलाच बरा, असे वंजिरा मथाई म्हणाल्या. हे सर्व प्रश्न लक्षात घेवूनच वंगारी मथाई (वंजिरा मथाई यांच्या आई) यांनी १९७७ साली ग्रीनबेल्ट मुव्हमेंटची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी वृक्ष लागवडीवर भर दिला. ज्या भागात वृक्षांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी पारंपरिक वृक्षांची लागवड करण्याचे काम हाती घेण्यात आले. बघता-बघता तब्बल ४० कोटी वृक्षांची लागवड झाली. आज केनिया, नायझेरिया, युगान्डा आदी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहेत. परिणामी गुऱ्हा, चायना, मलेरवा, युरेवा, नायरो या कोरड्या पडलेल्या नद्यांना वर्षभर पाणी असते. त्यामुळे त्या-त्या भागातील नागरिकांची आर्थिक उन्नती होण्यास मदत झाल्याचेही मथाई यांनी सांगितले. याच कामाच्या बळावर आई वंगारी मथाई यांना २००४ मध्ये ‘नोबेलपीस’ने गौरविण्यात आले. आईने ‘ग्रीनबेल्ट’च्या माध्यमातून केलेले काम पुढे नेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पाणी, अन्नसुरक्षा आणि वृक्ष लागवड यासोबतच आता ‘ऊर्जा’या घटकावरही काम करण्यात येत असल्याचे सांगितले. भारतामध्ये स्वंय शिक्षण प्रयोग या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सौरऊर्जेसह अन्य घटकावर मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे. हेच काम पहाण्यासाठी आम्ही भारतामध्ये आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आफ्रिकी देशामध्ये मागील काही वर्षांमध्ये वृक्ष लागवडीवर भर दिला आहे. वृक्ष लागवडीसोबतच जोपासणा करण्यावरही तितकेच लक्ष दिले जाते. त्यामुळे या देशांतील वृक्षांची संख्या वाढली आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या असता वृक्षांची संख्या खुपच कमी असल्याचे दिसले. त्यामुळे जमिनीची धूपही होत आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. हे टाळण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आपल्याकडे बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. नवीन वृक्षांची लागवड केली तर ते जगेलच याची शास्वती नसते. मात्र, याच्या उलट चित्र आफ्रिकी देशांमध्ये आहे. तेथे केवळ वाळलेली झाडे तोडली जातात. त्या लाकडांचा वापर जळणासाठी केला जातो. मात्र, वाळलेले झाड तोडल्यानंतर त्या ठिकाणी लागलीच वृक्षारोपण केले जाते. वृक्ष लागवड केल्यानंतर त्याची जोपासणाही तितक्याच काटेकोरपणे केली जाते. म्हणून दहा रोपे लावली तर ती सर्वच्यासर्व जगतात, असे वंजिरा मथाई म्हणाल्या.