देशाचे निधर्मी स्वरुप बदलण्याचा डाव : आंबेडकर
By Admin | Updated: August 13, 2015 00:22 IST2015-08-13T00:10:55+5:302015-08-13T00:22:20+5:30
उस्मानाबाद : गुजरात शासनाने पाठ्यपुस्तकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धडा मागे घेतला आहे. या धड्यामध्ये धर्मांतरण तसेच २२ प्रतिज्ञांचा उल्लेख होता.

देशाचे निधर्मी स्वरुप बदलण्याचा डाव : आंबेडकर
उस्मानाबाद : गुजरात शासनाने पाठ्यपुस्तकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धडा मागे घेतला आहे. या धड्यामध्ये धर्मांतरण तसेच २२ प्रतिज्ञांचा उल्लेख होता. देशातल्या परंपरेचा त्याग कशासाठी केला याची कारणमिमांसाही त्यामध्ये करण्यात आली होती. हा एकप्रकारे देशाचे निधर्मी स्वरुप बदलण्याचा डाव असल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
बुधवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह डॉ. भारत पाटणकर, कॉ. सुबोध मोरे तसेच डाव्या चळवळीतील पदाधिकारी, नेत्यांनी तालुक्यातील अनसुर्डा गावास भेट देवून पिडीत कुटुंबियांशी चर्चा केली. त्यानंतर ते ‘लोकमत’शी संवाद साधत होते. या देशाला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. गौतम बुद्धही याच परंपरेतील होते. मागील काही वर्षांपासून संतांची परंपरा नाकारण्याचा प्रयत्न काही संस्था तसेच धार्मिक संघटना जाणीवपूर्वक करीत असून, देशाची असलेली निधर्मी ओळख पुसून देशाला वैदिक हिंदू राष्ट्र दाखविण्याचा डाव यामागे असल्याचा ते म्हणाले. गुजरात शासनाने डॉ. आंबेडकरांचा पाठ्यपुस्तकातील धडा वगळून यात आता शासनही सहभागी होत असल्याचे दाखवून दिल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. या प्रकाराबाबत गुजरातमध्ये तेथील संघटना आंदोलन उभारत असून, हा प्रश्न आम्ही लोकांमध्ये घेऊन जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
या प्रकारावरुन शासनाने फॅसिझमकडे सुरुवात केली असल्याचा आरोप करीत, आम्हाला पाहिजे ते मान्य आणि आम्हाला मान्य तेच तुम्ही मान्य केले पाहिजे, अशी हुकूमशाही वृत्ती यामागे असल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. अशा पद्धतीच्या हुकूमशाही वृत्तीशी लढण्याशी लोक जागृती महत्वाची असून, यासाठीच यापुढील काळात काम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
अनसुर्डा येथील अत्याचार प्रकरण गंभीर आहे. आम्ही सांगतो तेच तुम्ही ऐकले पाहिजे, अशा पद्धतीची मनोवृत्ती तेथे दिसून आली. याप्रकरणामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग नसून, त्या गावातील काही मोजकी मंडळी या कष्टकरी कुटुंबियांचा छळ करीत आहेत. याच मोजक्या मंडळीच्या दबावाखाली तेथील पिडित ११ कुटुंबासह गावातील इतर कुटुंबेही असून, याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. धार्मिक भावना रुजविण्यासाठी मुस्लिमांना तर जातीची भावना समाजात रुजविण्यासाठी दलितांना टार्गेट केले जात आहे.
सदर गावातील प्रकार काही महिन्यांपासून सुरु असताना मुख्यमंत्र्यांसह एकाही मंत्र्याने तेथे भेट दिलेली नाही. हा प्रकार दुर्दैैवी असल्याचे ते म्हणाले.