रुग्णवाहिका चालकाची तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:05 IST2021-04-28T04:05:22+5:302021-04-28T04:05:22+5:30
वासडी : ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. त्यामुळे सर्व कोरोना योद्धे आपापल्या स्तरावरून तत्पर सेवा देत आहेत. ...

रुग्णवाहिका चालकाची तारेवरची कसरत
वासडी : ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. त्यामुळे सर्व कोरोना योद्धे आपापल्या स्तरावरून तत्पर सेवा देत आहेत. नाचनवेल, कंरजखेडसह वासडी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह व रुग्णवाहिका चालकांची अग्निपरीक्षा सुरू आहे. नियमित कामाबरोबरच कोविडमुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे, तरीदेखील हसतमुख होत आपल्या कामातील मिळणारे समाधानच त्यांना अधिक ऊर्जा देत आहेत.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कोरोना चाचणीचे प्रमाणदेखील वाढले आहे. औरंगाबादला कोरोना सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यासाठी कन्नड येथे सातत्याने फेऱ्या माराव्या लागत आहेत, तर गावागावात जाऊन शेत शिवारातून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोना चाचणीचे नमुने घेऊन जावे लागते. त्यातच जननी शिशू सुरक्षा योजनेला प्राधान्य द्यावे लागत आहे. गर्भवती मातेला योग्य वेळी उपचारासाठी दाखल करण्यासाठी रात्री-बेरात्री रुग्णवाहिका चालकांना धावपळ करावी लागत आहे.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा भाव मनात ठेवून चालक काम करीत आहेत. मात्र, ही जबाबदारी पार पडताना त्यांना कोविडचे ही अतिरिक्त काम अंगावर घेऊन करावे लागत आहे. लसीकरणासाठी देखील प्रत्येक उपकेंद्रात जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोट
कितीही थकवा आला तरी रुग्णांचा त्रास आणि नातेवाइकांची चिंता पाहून काम करावे लागते. मात्र, त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हा कामाचा थकवा दूर करते. कामात खूप समाधान मिळते. सध्या अतिरिक्त ताण वाढला आहे. हुस्नउद्दीन पठाण, नाचनवेल प्रा. आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका चालक.
--
आरोग्यसेवेसाठी आम्हाला चोवीस तास तत्पर राहावे लागते. कर्तव्य पूर्ण केल्यावर रुग्णांच्या नातेवाइकांना समाधान झाल्याचे पाहून आनंद होतो. मी पंधरा वर्षांपासून या सेवेत कार्यरत आहे. कष्टाचे काम करूनही आम्ही कंत्राट पद्धतीवर काम करीत आहोत. शासनाने आमची दखल घ्यावी, अशी मागणी आहे.
- राहुल चौतमल, चालक, करंजखेड प्रा. आ. केंद्र.