८ एप्रिलपासून जालन्यात आंबेडकर व्याख्यानमाला
By Admin | Updated: March 16, 2015 00:46 IST2015-03-16T00:32:29+5:302015-03-16T00:46:23+5:30
जालना : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेने यंदा ३८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ८ एप्रिल ते १३ एप्रिल या काळात विविध विषयांवर मान्यवरांच्या विचारांची शिदोरी मिळणार आहे

८ एप्रिलपासून जालन्यात आंबेडकर व्याख्यानमाला
जालना : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेने यंदा ३८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. ८ एप्रिल ते १३ एप्रिल या काळात विविध विषयांवर मान्यवरांच्या विचारांची शिदोरी मिळणार आहे, अशी माहिती व्याख्यानमालेचे स्वागताध्यक्ष आ. अर्जुनराव खोतकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
या व्याख्यानमालेचे सन २०१५ चे अध्यक्ष म्हणून सुधाकरभाई निकाळजे यांची निवड झालेली आहे. व्याख्यानमालेस ८ एप्रिलपासून प्रारंभ होत असून दररोज सायंकाळी ७ वाजता कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात विविध विषयांवर वक्त्यांचे मार्गदर्शन नागरिकांना ऐकायला मिळणार आहे.
८ रोजी राज्य शासनाचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते व्याख्यानमाला सत्राचे उदघाटन होणार आहे. आंबेडकरी समाजातील उच्चशिक्षितांची सामाजिक जबाबदारी - सद्यस्थिती व उपाय या विषयावर गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, बीड येथील उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, न.प. मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांची उपस्थिती राहणार आहे.
९ एप्रिल रोजी वैजापुर येथील कै. विनायक पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. समिता जाधव ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाशित पैलू या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, नगरसेविका मनकर्णा डांगे, मंगलबाई दाभाडे, डॉ. प्रतिभा गद्रे, प्रा. सुनंदा तिडके यांची उपस्थिती राहणार आहे.
१० एप्रिल रोजी अविनाश महातेकर हे आंबेडकरी चळवळीचे राजकीय अस्तित्व, सद्यस्थिती व उपाय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पत्रकार अंकुशराव देशमुख, लक्ष्मण राऊत, बद्रीनाथ टेकाळे, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अॅड. शिवाजी आदमाने यांची उपस्थिती राहणार आहे.
११ रोजी नागपूर येथील प्राचार्य चंद्रशेखर चांदेकर हे महात्मा फुले यांचा सामाजिक, आर्थिक व राजकीय विचारांचा संविधानावरील प्रभाव या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी नगरसेवक गणेश रत्नपारखे यांची उपस्थिती राहणार आहे.
१२ रोजी मुंबई विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख प्रा.डॉ. सुरेश माने हे बहुजनांच्या विकासात डॉ. आंबेडकरांचे योगदान- घटनात्मक तरतुदी, सद्यस्थिती व उपाय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नागपूरचे अध्यक्ष कृष्णाजी इंगळे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त भगवान वीर, अॅड. बाबूराव ससाने, डॉ. संजय राख, रशीद पहेलवान, सचिन साठे यांची उपस्थिती राहणार आहे.
१३ रोजी खंजिरी सम्राज्ञी शाहीर मीराताई उमप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा भीमगितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी आ. राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, आ. नारायण कुचे, दलितमित्र बाबूलाल पंडित, सुधाकर रत्नपारखे, फिरोजलाला तांबोळी, विलास डोळसे, अशोक साबळे, अॅड. दशरथ इंगळे, एकबाल पाशा, अण्णा सावंत, उपनगराध्यक्ष शाह आलम, राजेश राऊत आदींची उपस्थिती राहणार आहे.
या पत्रपरिषदेस आ. अर्जुनराव खोतकर, सुधाकरभाई निकाळजे, अॅड. बी.एम. साळवे, सुधाकर रत्नपारखे, गणेश रत्नपारखे, बाबूलाल पंडित, सगीर अहेमद, प्रा. सत्संग मुंढे, दिनकर घेवंदे, रोहिदास गंगातिवरे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)