अंबाजोगाई शहर मोर्चे, आंदोलनांनी दणाणले

By Admin | Updated: August 22, 2014 01:00 IST2014-08-22T00:19:47+5:302014-08-22T01:00:16+5:30

अंबाजोगाई : शहरात विविध मागण्यांसाठी जनवादी महिला संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर गुरुवारी हल्ला बोल तर कैकाडी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा,

Ambazogai City Front, Movement Scales | अंबाजोगाई शहर मोर्चे, आंदोलनांनी दणाणले

अंबाजोगाई शहर मोर्चे, आंदोलनांनी दणाणले



अंबाजोगाई : शहरात विविध मागण्यांसाठी जनवादी महिला संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर गुरुवारी हल्ला बोल तर कैकाडी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या दोन्ही मोर्चांमुळे शहर दणाणून गेले होते.
अन्न सुरक्षा कायदा सर्व कष्टकऱ्यांना लागू करा, तसेच अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, यासह विविध मागण्यांसाठी जनवादी महिला संघटनेच्या वतीने गुरुवारी तहसीलवर हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. सदर बाजार, पंचशीलनगर, पोलीस ठाणेमार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी सहभागी महिलांनी घोषणाबाजी करीत व संघटीत कामगारांची तहसीलकडे नोंद ठेवा, श्रमिकांना दारिद्र्यरेषेचे कार्ड द्या, बांधकाम मजुरांना फंड वाटप करा, वयोवृद्ध मजुरांना ३ हजार रुपये मानधन द्या, शहरातील अवैध धंदे बंद करा, शहरातील आॅटोरिक्षातील टेपरेकॉर्डर जप्त करा, यासह विविध मागण्या केल्या. निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. मोर्चात अध्यक्षा उषा पोटभरे, सुलोचना चिमणे, सविता गायसमुद्रे, आशा गालफाडे, अनिता जिरंगे, सपना नाईकवाडे, उषा आदमाने, सुनीता गोमसाळे, तोळणबाई लोंढे, मंगलाबाई उपाडे, मालन मुंडे, नागाबाई जोगदंड, गजराबाई गोरे, बब्रुवान पोटभरे, संतोष चिमणे, परमेश्वर शिंदे यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कैकाडी समाजाचा मोर्चा
दुसरा मोर्चा न्या. बापट आयोगाने कैकाडी समाजाबाबत केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करून क्षेत्रीय बंधन उठविण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी कैकाडी समाजाच्या वतीने गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांना दिले.
कैकाडी समाज स्वातंत्र्यानंतर अजूनही उपेक्षित आहे. समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. बापट आयोगाने अभ्यास करून सन २००६ साली कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधन उठवावे असा अहवाल दिला. परंतु राज्य शासनाने याबाबत ठोस उपाययोजना आखल्या नाहीत. समाजाचा अनुसूचित जाती-जमातीत समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आगामी काळात पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व अ.भा. कैकाडी समाज महासंघाचे अध्यक्ष संजय मेढे, रोहिदास जाधव, प्रा. विष्णु जाधव, सविता जाधव, मनिषा गायकवाड, उत्तम गायकवाड यांच्यासह कैकाडी समाजाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Ambazogai City Front, Movement Scales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.