अंबड तालुक्यातील मोसंबी बागा संकटात
By Admin | Updated: July 16, 2014 01:26 IST2014-07-16T00:05:22+5:302014-07-16T01:26:32+5:30
शेवगा : अंबड तालुक्यातील मोठ्या क्षेत्रावरील मोसंबी फळबागा संकटात सापडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कमी पडत असलेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

अंबड तालुक्यातील मोसंबी बागा संकटात
शेवगा : अंबड तालुक्यातील मोठ्या क्षेत्रावरील मोसंबी फळबागा संकटात सापडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कमी पडत असलेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील निम्म्या मोसंबी बागाचे सरपण झाले आहे. आज थोड्या फार प्रमाणात ज्या बागा उभ्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या हिंमतीवर उभ्या आहेत. आजच्या परिस्थितीला पाऊस लांबल्याने मोसंबी बागा जगवणे कठीण झाले आहे. या बागा वाचाव्यात याकरिता बळीराजा आभाळाकडे नजर लावून बसला आहे.
मागच्या काही महिन्यांपूर्वी गारपीट, दुष्काळ आणि आता लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गारपीटीमुळे रबीचे पूर्ण पीक वाया गेले. धान्य नाहीच तसेच गारपीट याद्यात मोठा घोळ यामुळे बळीराजा खूप मोठ्या संकटात आहे. आज पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
तालुक्यातील मोसंबी, आंबा, डाळींब या फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मोठा पाऊस न झाल्यास मोसंबी बागा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.
मोसंबी पीक बहरत असताना गारपीट झाली. यामुळे आंबा बार बळीराजाच्या हातून गेल्यामुळे बळीराजा खचून गेला आहे. मोसंबी, डाळींब, आंबा बागा वाचविण्यासाठी शासनाने उपाययोजना करुन तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेवगा, हरतखेडा, लालवाडी, सारंगपूर, दूधपुरी, दहिपुरी, बोरी, पारनेर, धनगर पिंप्री आदी गावातून होत आहे.
(वार्ताहर)