अंबडला पाणी मिळाले

By Admin | Updated: January 23, 2015 00:54 IST2015-01-23T00:27:24+5:302015-01-23T00:54:51+5:30

अंबड : जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहरासाठी जोडणीच्या कामास बुधवारी सायंकाळी सुरुवात झाली असुन दोन दिवसात पाणी मिळणार

Ambalad got water | अंबडला पाणी मिळाले

अंबडला पाणी मिळाले


अंबड : जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहरासाठी जोडणीच्या कामास बुधवारी सायंकाळी सुरुवात झाली असुन दोन दिवसात पाणी मिळणार असल्याची माहिती आ राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आ टोपे यांनी यापुढे नगरपालिका सक्तीची वसुली व अवैध नळ कनेक्शन कट करण्याची मोहिम राबविणार असल्याचेही सांगितले.
यावेळी बोलताना आ टोपे म्हणाले की, जायकवाडी-जालना योजनेत शहराचा समावेश करण्यासाठी जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात नागरिकांच्या नळाला जायकवाडीचे पाणी मिळणार आहे. याकरिता अंबड नगरपालिकेने पाण्याची रक्कम अडवान्स भरली आहे. शहरास या योजनेतुन सध्या ४ एमएलडी पाणी मिळणार आहे. सध्याची शहराची पाण्याची आवश्यकता पाहता शहरासाठी ४ एमएलडी पाणी पुरसे ठरणार आहे. मात्र यासाठी नागरिकांनी जबाबदारीने पालिकेला नळपट्टी वसुलीसाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अंबड नगरपालिका पाण्यासाठी पैसे एक महिना अगोदर भरणार असल्याने नळपट्टी वसुली समाधानकारक राहिल्यास नगरपालिकेला पाण्यासाठीचे पैसे भरण्यास अडचण येणार नाही. यासाठी पालिकेला नळपट्टी करामध्ये काही प्रमाणात वाढ करावी लागणार असुन नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे. नळपट्टीमध्ये किती प्रमाणात वाढ करायची याविषयी येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आ टोपे यांनी यावेळी सांगितले. जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत समावेश झाल्यानंतर शहराची अंतर्गत जलवितरण व्यवस्था हा महत्वाचा मुद्दा राहणार आहे. शहराची जलवितरण व्यवस्था ही निजामकालिन असुन यामध्ये बदल आवश्यक आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या सहकार्याने शहरातील अंतर्गत जलवितरण व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
संपुर्ण अंतर्गत वितरण यंत्रणा बदलुन त्याजागी नविन वितरण व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. जायकवाडी-जालना योजनेत शहराचा समावेश झाल्याने अतिरिक्त जलशुध्दीकरण केंद्राचा प्रश्न निर्माण होणार आहे.
याकरिता जलशुध्दीकरण केंद्राशेजारी अस्तित्वात असलेल्या मात्र कार्यरत नसलेल्या जलशुध्दीकरण केंद्राची दुरुस्ती करुन ही जलशुध्दीकरण केंद्राची इमारत कार्यान्वित करणार असल्याचेही यावेळी टोपे यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा मंगल कटारे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे, उद्योजक काकासाहेब कटारे, नगरसेवक शिवप्रसाद चांगले, राजेश सावंत, जितेंद्र बुर्ले, संजय साळवे, कैलास भोरे, समद बागवान आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अंबड शहराचे पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे मागील काही काळापासुन शहरास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. शहराचा समावेश जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत करावा अशी आग्रही मागणी सर्वच राजकीय पक्षांनी वेळोवेळी केली होती. शहराचा योजनेत समावेशासाठी शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी पंधरा दिवसांचे जलआंदोलन केले होते.
अंबड शहराचा जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांचे शतश: आभार मानत असल्याचे आ. टोपे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Ambalad got water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.