अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे भिजत घोंगडे
By Admin | Updated: June 15, 2014 00:56 IST2014-06-15T00:19:55+5:302014-06-15T00:56:13+5:30
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न मागील दोन तपांपेक्षा अधिक काळापासून शासन दरबारी प्रलंबित आहे़

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे भिजत घोंगडे
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न मागील दोन तपांपेक्षा अधिक काळापासून शासन दरबारी प्रलंबित आहे़ जनआंदोलने उभी राहिली, लोक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर आले, लोकप्रतिनिधींनी राजीनामे फेकले; परंतु शासनाने हा प्रश्न काही निकाली काढलाच नाही़ ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीच्या अंगाराची धग वाढली आहे़
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या आंदोलनात कै़ गोपीनाथराव मुंडे, माजी नगराध्यक्ष कै. शंकरराव डाके, कै. अरूण पुजारी, राजकिशोर मोदी, नंदकिशोर मुंदडा, डॉ. द्वारकादास लोहिया, अमर हबीब यांनी सक्रिय सहभाग नोंदविला़ या आंदोलनासाठी कृतीसमितीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली़ सर्वच राजकीय पक्ष आपले मतभेद बाजूला ठेवून आंदोलनात सक्रिय झाले; परंतु आंदोलनाला यश आले नाही़
पालिकेवर जिल्हा अंबाजोगाई असा उल्लेख
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी प्रखर झाल्यानंतर शहरवासीयांनीच १५ आॅगस्ट १९९६ साली नगर परिषदेच्या नामफलकावर जिल्हा अंबाजोगाई असा मोठा उल्लेख केला़ त्यावेळेसपासून शहरातील अनेकांनी जिल्हा अंबाजोगाई असा वापर सुरू केला.
हवाछोड आंदोलनाला हिंसक वळण
१५ आॅगस्ट १९९७ साली जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी पुकारलेल्या हवा छोडो आंदोलनाला हिंसक वळण लागले होते़ अश्रूधुरांच्या कांड्या फोडण्यात आल्या. शहरात ‘कर्फ्यू’देखील लागू केला होता. याप्रकरणी १०७ जणांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक झाली. बीडच्या कारागृहात तीन दिवसांचा कारावास या सर्वांनी भोगला़
सलग पाच दिवस चालले होते बेमुदत उपोषण
१९९७ मध्ये अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी शहरात सलगपाच दिवस बंद पुकारला होता़ बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलन व्यापक केले होते़ सर्वच पक्ष, संघटनांनीही आंदोलनात उडी घेतली़ युती शासनाच्या काळात तत्कालिन मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी जिल्हा निर्मितीचे आश्वासन देऊन हे उपोषण मागे घ्यायला लावले होते.
१९६२ पासूनची मागणी
निजामी राजवटीत अंबाजोगाई हे जिल्ह्याचे प्रमुख केंद्र होते. मुक्तिसंग्रामाच्या लढ्याचे केंद्र कायम अंबाजोगाई राहिले. स्वातंत्र्यानंतर १९६२ साली नगराध्यक्ष नाना जोशी यांनी दोन ठराव मांडले होते. मोमीनाबादऐवजी अंबाजोगाई असे शहराचे नामकरण करा व अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती यांचा त्यात समावेश होता़ यापैकी अंबाजोगाई हे नाव अस्तित्वात आले. मात्र, जिल्ह्याची मागणी प्रलंबितच आहे.
असा असेल नियोजित
अंबाजोगाई जिल्हा
बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई नियोजित जिल्हा सहा तालुक्यांचा असणार आहे. यात अंबाजोगाई, परळी, माजलगाव, केज, धारूर, रेणापूर या तालुक्यांचा समावेश असेल.
शासकीय कार्यालयेदेखील सज्ज
अंबाजोगाई जिल्हानिर्मितीचा निर्णय झालाच तर त्यासाठी पूरक असलेली शासकीय कार्यालये आधीच शहरात आहेत़ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयांच्या टोलेजंग इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, विशेष भूसंपादनाची तीन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उपअधीक्षक लघु पाटबंधारे कार्यालय अशी सर्वच कार्यालये कार्यान्वित आहेत़ जिल्ह्यासाठी लागणारी सर्व संरचना उपलब्ध आहे. शहरालगत वन खात्याची सुमारे ४ हजार एकर जमीन आहे. त्या शिवाय सरकारी भूखंडही उपलब्ध आहेत. फक्त अंबाजोगाईकरांना प्रतीक्षा आहे, ती जिल्हा निर्मितीच्या निर्णयाची़
व्यापक जनआंदोलन उभारणार - राजकिशोर मोदी
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी व या मागणीच्या परिपूर्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल़ प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी बोलतांना दिली. आजपर्यंतच्या प्रत्येक आंदोलनात मी सक्रिय राहिलेलो आहे़ जिल्हा निर्मितीने विकासाला गती येईल़
मतभेद बाजूला ठेवा - एस. बी. सय्यद
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी राजकीय मतभेद विसरून सर्वांनी सोबत यावे. सर्वांची एकजूट ठेवून जनआंदोलन उभारल्यास निश्चितच हा लढा प्रभावी ठरेल व परिणामी, शासनालाही याची दखल घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते एस. बी. सय्यद यांनी व्यक्त केली.
पाठपुरावा सुरू - आ. साठे
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी माझा प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरूच असून प्रत्येक अधिवेशनात आपण औचित्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, असे आ़ पृथ्वीराज साठे यांनी सांगितले़ आठवडाभरापूर्वीच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदनही त्यांना दिले असल्याचे आ. साठे म्हणाले.
राजीनाम्याची तयारी ठेवावी - अमर हबीब
अंबाजोगाईकरांच्या जिव्हाळ्याचा जिल्हा निर्मितीचा हा प्रश्न वेळीच मार्गी लागला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी ठेवावी़ राजीनामे देऊन प्रशासनावर दबाव आणून जनआंदोलन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी दिली.
जनआंदोलन हवे- डॉ. द्वारकादास लोहिया
महसूल आयुक्तांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा पोषक अहवाल शासनाकडे पाठविलेला आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती झाल्यास विकासात मोठी भर पडणार आहे. अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे यासाठी व्यापक जनआंदोलनाची तयारी हवी, अशी प्रतिक्रिया मानवलोकचे डॉ. द्वारकादास लोहिया यांनी दिली.