अंबाजोगाईत स्वच्छतेप्रश्नी मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: October 29, 2014 00:46 IST2014-10-29T00:19:22+5:302014-10-29T00:46:04+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालून

अंबाजोगाईत स्वच्छतेप्रश्नी मुख्याधिकाऱ्यांना घेराव
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालून स्वच्छतेबाबत आपला संताप व्यक्त केला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी झंवर यांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन कार्यकर्त्याला दिले.
अंबाजोगाई शहरात नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या अस्वच्छतेमुळे शहरात डेंग्यूसदृश रोगाची लागण झाल्याने अनेकजण शासकीय रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डेंग्यूसदृश रोगामुळे काही दिवसांपूर्वीच शहरातील दोघांचा मृत्यू झाला होता. यात एका नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
यासंदर्भात शहरवासीयांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बबन लोमटे व नगरसेवकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना यावर उपाययोजना करण्याच्या संदर्भात निवेदन दिले होते. निवेदन देऊनही नगर परिषद प्रशासन स्वच्छतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे मंगळवारी मुख्याधिकारी झंवर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून या प्रश्नी आपला संताप व्यक्त केला. यावर नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख उमरदंड यांनी शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी काही कालावधी देण्याची विनंती केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला आठ दिवसाचा कालावधी स्वच्छतेच्या संदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. या आठ दिवसात नगर परिषदेच्या वतीने उपाययोजना न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, गिरधारीलाल भराडिया, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, किशोर परदेशी, शेख रहिमभाई, नगर परिषदेचे गटनेते बबन लोमटे, डॉ. नरेंद्र काळे, सुरय्या चौधरी, दिनेश भराडिया, दिनेश लोमटे, सारंग पुजारी, अनिल पिंपळे, रऊफ बागवान, सुनिल जोगदंड, सलिम चौधरी, शेख सुजाद शेख मुसा, मंगेश देशपांडे, अनंत आरसुडे, बाला पाथरकर यांच्यासह आदिंची प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर)