तीन वर्षांच्या दुष्काळानंतर वेळा अमावस्या जोरात !
By Admin | Updated: December 27, 2016 23:58 IST2016-12-27T23:57:24+5:302016-12-27T23:58:37+5:30
लातूर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने चांगलीच साथ दिली आहे़

तीन वर्षांच्या दुष्काळानंतर वेळा अमावस्या जोरात !
आशपाक पठाण लातूर
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने चांगलीच साथ दिली आहे़ जिल्ह्यात वेळा अमावस्या उत्सव दरवर्षी शेतकरी सण म्हणूनच साजरा करतात़ आप्तस्वकियांसाठी उठणाऱ्या जेवणाच्या पंगती मागील तीन वर्षातील दुष्काळामुळे कमी झाल्या होत्या़ यावर्षी भरपूर पाऊस झाला़ त्यामुळे शेत-शिवाराने हिरवा शालू पांघरला आहे़ पिके जोमात असल्याने यंदाच्या वेळामवस्येत शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे़
लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत दुष्काळाच्या झळा तीव्र होत्या़ विंधन विहिरी, नद्या, नाले कोरडेठाक पडले होते़ परिणामी, जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता़ अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पाणीही घरातूनच घेऊन जावे लागले होते़ शेतात पेरले ते उगवलेही नाही़ तीन वर्षांपासून शेती तोट्यात होती़ निसर्गाच्या कृपेने यावर्षी जोरदार पाऊस झाला़ खरिपाची पिके जोमात आली़ काढणीच्या वेळी नद्या, नाल्यांना आलेल्या पुरात अनेक ठिकाणची पिके वाहून गेली यातही शेतकरी खचले नाही़ कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ कधीही परवडला म्हणत शेतकरी यातून सावरले़
रबी पिकांची पेरणी वेळेत झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी, करडई आदी पिकांनी शिवारं फुलली आहेत़ खरिपाची तूर बहरली असून शेंगा जास्त लागल्याने काही ठिकाणी फांद्या जमिनीला लोळत आहेत़ शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने ऊस लागवडीचे क्षेत्रही वाढले आहे़ जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, शेतीसाठी मुबलक पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदात आहे़ विजेचा लपंडाव असला तरी महावितरणच्या नियोजनानुसार शेतकरी पिकांना पाणी देत आहेत़ पिके जोमात असल्याने शेतकरी मोठ्या आनंदात आहे़