आंबेडकर पार्कवर उसळला निळाईचा जनसागर
By Admin | Updated: April 15, 2017 00:20 IST2017-04-15T00:15:59+5:302017-04-15T00:20:38+5:30
लातूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लातूर शहर व जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली.

आंबेडकर पार्कवर उसळला निळाईचा जनसागर
लातूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लातूर शहर व जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली. लातूर शहरातील आंबेडकर पार्कवर निळाईचा जणू सागरच उसळला होता. महामानवाला अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी झाली. ‘जय भीम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करून अभिवादनाला सुरुवात झाली. महानगरपालिकेच्या निवडणुका असल्याने सर्वपक्षीय नेत्यांची आंबेडकर पार्कवर रेलचेल होती. डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सर्वपक्षीय नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शुक्रवारी सकाळी ९ वाजता भन्ते पय्यानंद यांच्या उपस्थितीत महाबुद्धवंदना घेण्यात आली. सायंकाळी लातूर शहरातील वस्त्यांमधून भव्य मिरवणुका निघाल्या.
सायंकाळी ६ वाजल्यापासून शहरातील विविध भागांतून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशा आणि लेझीम पथकांचे सादरीकरण करीत या मिरवणुका सायंकाळी ६ वाजेपासून सुरू होत्या. शहरातील पश्चिम भागातील प्रकाश नगर, विक्रम नगर, अवंती नगर, विकास नगर, कपिलनगर, खाडगाव रोड, गौतम नगर, दीपज्योती नगर इ. भागांतून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. बार्शी रोडवरील संविधान चौकात तसेच ईदगाह मैदानासमोर स्वागत कक्ष स्थापन करण्यात आले होते. या स्वागत कक्षातून जयंती मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. तर पूर्व भागातून बौद्धनगर, आनंदनगर, साठे नगर, सिद्धार्थ सोसायटी, बोधेनगर, मोतीनगर, नांदेड नाका भागांतील वस्त्यांमधूनही भव्य मिरवणुका निघाल्या होत्या.
डॉल्बीच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. लेझीम पथक, नृत्यांचे सादरीकरण, आकर्षक देखाव्यांनी मिरवणुका लक्षवेधी होत्या. विशेष म्हणजे मिरवणुकांमध्ये तरुण-तरुणींसह महिलांचाही सहभाग मोठ्या संख्येने होता.