अॅल्युमिनियम तार चोरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: July 4, 2017 23:49 IST2017-07-04T23:45:24+5:302017-07-04T23:49:53+5:30
परभणी : येथील खंडोबा बाजार परिसरातील ३३ के.व्ही. उपकेंद्रातील दीड लाख रुपयांची अॅल्युमिनियम तार चोरून नेताना पोलिसांनी ३ चोरट्यांना पकडले आहे.

अॅल्युमिनियम तार चोरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील खंडोबा बाजार परिसरातील ३३ के.व्ही. उपकेंद्रातील दीड लाख रुपयांची अॅल्युमिनियम तार चोरून नेताना पोलिसांनी ३ चोरट्यांना पकडले आहे. नानलपेठ पोलिसांनी ४ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.
येथील खंडोबा बाजार परिसरात महावितरण कंपनीचे ३३ के. व्ही. उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून तार चोरणारी टोळी या भागात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नानालपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी सय्यद उमर, संजय पुरी यांनी मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास या भागात सापळा लावला. तेव्हा एम. एच. २४/६३९४ हा आॅटोरिक्षा या ठिकाणी दाखल झाला. त्यात ३ आरोपी होते. वीज उपकेंद्रातील अॅल्युमिनियम तार चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही माहिती पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांना देण्यात आली. त्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक उस्मान शेख, उपनिरीक्षक अनिल सनगले, बाबू गिते, खडके, किरण भूमकर, एम. ए. मुजमुले आदींनी घटनास्थळ गाठले. यावेळी अॅल्युमिनियम तार चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक चोरटा पळून गेला. ज्ञानेश्वर मगर आणि शेख हसन अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी आॅटोरिक्षाही जप्त केला आहे. या प्रकरणी महावितरणचे लाईनमन सय्यद खाजा स. अकबर यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.