साथरोग नियंत्रण पथक पद्मावतीत दाखल
By Admin | Updated: September 2, 2014 01:50 IST2014-09-02T00:31:00+5:302014-09-02T01:50:30+5:30
जालना : भोकरदन तालुक्यातील पद्मावती गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातल्याने भाऊ-बहिणीचा बळी गेला, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’च्या १ सप्टेंबरच्या अंकातून प्रसिद्ध होताच

साथरोग नियंत्रण पथक पद्मावतीत दाखल
जालना : भोकरदन तालुक्यातील पद्मावती गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातल्याने भाऊ-बहिणीचा बळी गेला, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’च्या १ सप्टेंबरच्या अंकातून प्रसिद्ध होताच जिल्हा साथरोग नियंत्रण तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी हे दोन्ही पथक गावात दाखल झाले. घरोघर रुग्णांची तसेच पाण्याची तपासणी या पथकाने केली. गावात सध्या तापाचे चारच रुग्ण असल्याचा दावा या पथकाने केला आहे.
डेंग्यूसदृश्य तापाच्या आजाराने निवृत्ती उर्फ राजेंद्र भालचंद्र गावंडे (वय ५) व त्याची बहिण अश्विनी भालचंद्र गावंडे (वय ७ वर्षे) यांचा मृत्यू झाला. दोन मुलांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तापाने रुग्ण फणफणत आहेत. काही रुग्णांवर बुलढाणा तर काहींवर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. पद्मावती हे गाव तलावाच्या काठावर असल्याने व सध्या पावसाळ्यामुळे या भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे २० आॅगस्टपासून गावात तापाची साथ सुरू झाली.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर सोमवारी जिल्हा साथरोग नियंत्रण पथक व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक दुपारनंतर पद्मावती गावात दाखल झाले. घरोघर रुग्णांची तसेच पाण्यात डासअळींची तपासणी करण्यात आली. गावात १८ आॅगस्ट रोजी पाण्यात डासअळी आढळली होती. गावात साथरोग परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पथकामध्ये सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जी.एम. कुडलीकर, डॉ. अमोल गंधर, डॉ. एस.के. लांडगे यांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाचा दावा
या पथकातील डॉ. एस.के. लांडगे म्हणाले की, यापूर्वी २८ आॅगस्ट रोजीही पाण्यात डासअळींची तपासणी करण्यात आली. यात १६० घरांपैकी ६ घरांमध्ये डासअळी आढळली. त्यामुळे तेथील पाण्यात डासअळी नाशक औषधी टाकण्यात आली. ग्रामपंचायतच्या मदतीने गावात धूरफवारणीही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गावात नाल्या तुंबलेल्या असल्याने दुर्गंधी पसरली आहे. तेथील एका हापश्यामध्ये घाण पाणी आल्याने त्याचेही शुद्धीकरण करून घेतले. याबाबत संबंधित ग्रामपंचायतला लेखी सूचना करण्यात आल्याचेही डॉ. लांडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नळणी : येथून जवळच असलेल्या कोदोली गावातही तापाच्या आजाराने थैमान घातले असून रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत येथील आरोग्य सेवक एक महिन्यापासून गायब असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
४गावातील नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे तसेच पाण्याचे डबके तयार झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी साथरोगाने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गावात होणारा पाणीपुरवठाही दूषित आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश्य ताप असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गॅस्ट्रो, अतिसार या आजारांच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
४या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याचे दुर्लक्ष होत असून संबंधितांनी तात्काळ याची दखल घ्यावी, अशी मागणी प्रकाश गिरणारे, माधवराव गिरणारे, संजय गिरणारे, देवेंद्र गिरणारे, कृष्णा गिरणारे, उत्तम गिरणारे, ज्ञानेश्वर गिरणारे, गणपत गिरणारे, प्रमोद गिरणारे आदींनी केली आहे.
जळगाव सपकाळ : डेंग्यूसदृश्य तापाने जळगाव सपकाळ येथील अमोल कैलास सपकाळ (वय १८) या तरूणाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
४गेल्या आठ-दहा दिवसांपासून तापाने थैमान घातले आहे. अमोल सपकाळ या तरूणाच्या मृत्यूने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अमोल हा शिक्षणासाठी औरंगाबाद येथे राहत होता. मात्र पोळा सणामुळे तो गावी आला. त्याचवेळी तो तापाने फणफणला.
४रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. जयश्री बाबूराव सपकाळ (वय ८ वर्षे), यज्ञेश बाबूराव सपकाळ (वय ५ वर्षे) या भावंडांना उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे गावात साथ आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाने तापाच्या साथीची गांभिर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.