कोविड रुग्णालय बंद करण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:49+5:302021-06-09T04:06:49+5:30
औरंगाबाद : मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर प्रशासनाने बळजबरी खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्यास भाग पाडले होते. ...

कोविड रुग्णालय बंद करण्याची परवानगी द्या
औरंगाबाद : मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर प्रशासनाने बळजबरी खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्यास भाग पाडले होते. शहरात ९०पेक्षा अधिक खासगी रुग्णालयांमध्ये मागील दीड वर्षांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. कोरोनाची लाट ओसरताच आता खासगी रुग्णालयांनी कोविड सेंटर बंद करण्याची परवानगी द्या म्हणून महापालिकेकडे अर्ज केले आहेत. महापालिका प्रशासनाने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शासकीय रुग्णालय हाउसफुल्ल झाली होती. बेड कमी पडत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी मराठवाडा तसेच इतर जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने येत होते. मागील एक महिन्यांपासून कोरोनाची लाट झपाट्याने ओसरत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण अजिबात नाहीत. कोरोनामुळे इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करणे अशक्य होत आहे. त्यामुळे कोविड सेंटर बंद करण्याची परवानगी द्यावी म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तब्बल नऊ रुग्णालयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र मनपा प्रशासनाने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल हे निश्चित नाही. पुन्हा मोठी लाट आल्यास बेड उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे आणखी काही दिवस वाट पहावी, असे मत आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केले.