जिल्हा परिषदेत निधीचे समान वाटप होणार
By Admin | Updated: September 12, 2014 00:06 IST2014-09-11T23:52:35+5:302014-09-12T00:06:40+5:30
नांदेड : जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या १३ व्या वित्त आयोगाच्या निधीचे व सेस निधीचे समान वाटप करण्याची घोषणा

जिल्हा परिषदेत निधीचे समान वाटप होणार
नांदेड : जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या १३ व्या वित्त आयोगाच्या निधीचे व सेस निधीचे समान वाटप करण्याची घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची सभा असल्याने सदस्यांना मान देत अध्यक्षांनी शेवटी तरी समान निधी वाटप करावा अशी मागणी उपाध्यक्षांसह अनेक सदस्यांनी केली होती़
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरूवारी झालेली सर्वसाधारण सभा ही विद्यमान पदाधिकाऱ्यांसाठी शेवटची अर्थात निरोपाची सभा होती़ यावेळी झालेल्या विविध विभागांच्या आढाव्यात सदस्यांनी काही वेळा अधिकाऱ्यांना धारेवर धरले असले तरी शेवटच्या सभेत निरोपाचीच भाषणे सदस्यांनी केली़ बांधकाम विभागाची माहिती देताना दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही़ जी़ देशमुख यांना गट ब कार्यक्रमांतर्गत एकूण कामांची माहिती विचारली असता त्यांना ती सभागृहात सादर करता न आल्याने सदस्यांनी त्यांना धारेवर धरले़ तर उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ एम़ तायडे यांची अनुपस्थितीही सदस्यांच्या संतापाचे कारण ठरले़ कार्यकारी अभियंता पदाच्या चार दिवसांच्या काळात उपअभियंता वहाब यांनी दिलेल्या देयकांची चौकशी झाली नसल्याने नागोराव इंगोले, रमेश सरोदे, मोहन पाटील टाकळीकर यांनी प्रशासन काय करते असा सवाल केला़ समाजकल्याण विभागाच्या विषयात अडीच वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या नसल्याबद्दल डॉ़ मिनाक्षी कागडे, दिनकर दहिफळे आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली़
अध्यक्ष बेटमोगरेकर यांच्यासह उपाध्यक्ष प्रकाश राठोड, शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कऱ्हाळे, आरोग्य व अर्थ सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, समाजकल्याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर व महिला, बालकल्याण समिती सभापती कौशल्याताई तमशेट्टे यांची ही पदाधिकारी म्हणून अखेरची सभा ठरली़ त्यांच्याबद्दलही सभागृहात अनेक सदस्यांनी विचार व्यक्त केले़ त्यात रोहिदास जाधव, नागोराव इंगोले, श्रीनिवास मोरे, मारोतराव कवळे, दशरथ लोहबंदे, पुरूषोत्तम धोंडगे, वर्षाताई भोसीकर, रमेश सरोदे, गंगाधर तोटलोड, रमेश घंटलवाड, अशोक पाटील, डॉ़ मिनाक्षी कागडे यांनी विचार व्यक्त केले़ त्यात अध्यक्ष बेटमोगरेकर यांच्या कार्यशैलीबद्दल चांगले मत व्यक्त करताना विरोधकांना विश्वासात न घेणे, संघर्षमय काळ, ‘तळे राखताना पाणी चाखले’ यासह विरोधकांना गोल कसे करावे हे कसब त्यांना चांगले अवगत असल्याचाही उल्लेख करण्यात आला़
अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी अडीच वर्षातील चांगले-वाईट अनुभव कथन केले़ निवडून आलेल्या भागासाठी निधी नेणे हे प्रत्येक सदस्याचे काम आहे़ यात पदाधिकाऱ्यांकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगितले़ येणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडूनही त्या राहतील़ त्यावेळी आपल्या भूमिकेचे ते समर्थन करतील असेही ते म्हणाले़ सदस्यांशी झालेले वाद हे वैयक्तिक स्वरूपाचे नव्हते तर सार्वजनिक हितातून निर्माण झाले होते़ ते तत्कालीक होते असेही त्यांनी स्पष्ट केले़
आपल्यावर जादा निधी नेल्याचा आरोप झाला असला तरी इतर पदाधिकाऱ्यांनीही निधी नेल्याचे सांगतांना बेटमोगरेकर यांनी बांधकाम व शिक्षण सभापती कऱ्हाळे यांचा उल्लेख केला़ अध्यक्षांच्या खालोखाल जर निधी कुणी नेला असेल तर तो कऱ्हाळे यांनी नेला असे ते म्हणाले़ सभागृहाच्या भावना लक्षात घेवून १३ व्या वित्त आयोग व सेस निधीचे समान वाटप होईल अशी घोषणाही त्यांनी केली़ यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी गुलाब राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, वित्त अधिकारी बैनवाड यांच्यासह विभागप्रमुखांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
शिक्षण विभागातील वादग्रस्त १४७६ या आऊटवर्ड क्रमांकाद्वारे दिलेल्या बदल्यांच्या आदेशाबाबतही सभागृहात शिवसेनेचे इंगोले यांनी प्रश्न उपस्थित केला़ त्यावेळी सदर बदल्यांची संचिका आणि सर्व कागदपत्रे असल्याचा खुलासा अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी करताना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपणही केल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले़ प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाही़ निमशिक्षकांना नियुक्ती देताना १ जूनपासूनचे नियुक्ती आदेश दिले आहेत़ ते १ मार्चपासून देण्यात यावेत असे आदेशही शिक्षण विभागाला देण्यात आले़