जि.प.मध्ये युतीचाच दबदबा
By Admin | Updated: April 2, 2017 00:07 IST2017-04-02T00:03:40+5:302017-04-02T00:07:35+5:30
बीड : राष्ट्रवादीला बाजूला सारून जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्षपद पटकावल्यानंतर शनिवारी सभापती निवडीतही युतीने दबदबा कायम ठेवला.

जि.प.मध्ये युतीचाच दबदबा
बीड : राष्ट्रवादीला बाजूला सारून जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्षपद पटकावल्यानंतर शनिवारी सभापती निवडीतही युतीने दबदबा कायम ठेवला. चारपैकी दोन समित्या भाजपने राखल्या तर शिवसेना व काँग्रेसलाही सत्तेचा वाटा मिळाला. महिला बालकल्याण सभापतीपदी शोभा दरेकर तर समाजकल्याण सभापती म्हणून संतोष हंगे यांची वर्णी लागली. शिवसेनेचे युद्धजित पंडित व काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांची विषय समिती सभापती म्हणून निवड झाली. या दोघांसह उपाध्यक्षांचे खातेवाटप जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार पुढील बैठकीत करणार आहेत.
शनिवारी सकाळपासूनच सभापती निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. ११ वाजता पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. विनायक मेटे, माजी मंत्री सुरेश धस, बदामराव पंडित, रमेश आडसकर हे नेते जि. प. उपाध्यक्षा जयश्री राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी एकत्रित आले. सभापतीपदासाठी नेमकी कोणाची नावे निश्चित करायची ? यावरुन या नेत्यांत दोन तास खलबते झाली. दरम्यान, सभापतीपदासाठी युद्धजित पंडित यांचे नाव समोर आल्यानंतर आ. लक्ष्मण पवार बैठकीतून निघून गेले. उपाध्यक्षपदाच्या निवडीवेळी युद्धजित यांना पवारांनीच विरोध केला होता. सभापती निवडीतही त्यांची नाराजी लपून राहिली नाही.
दुपारी पावणेदोन वाजता भाजप, शिवसंग्राम, शिवसेनेच्या सदस्यांचा ताफा मस्के यांच्या निवासस्थानापासून सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीत पोहोचला. दुसरीकडे धैर्यशिल सोळंके यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी - काँग्रेस व काकू- नाना आघाडीचे सदस्य एकत्रित आले होते. ते देखील सभागृहात दाखल झाले. तत्पूर्वी १२ ते दोन या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करावयाचे होते. युतीकडून समाजकल्याण सभापतीपदासाठी संतोष हंगे, महिला व बालकल्याण समितीसाठी शोभा दरेकर व उर्वरित दोन समित्यांसाठी शिवसेनेचे युद्धजित पंडित व काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांचे अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादी व मित्रपक्षातर्फे समाजकल्याणसाठी प्रदीप मुंडे, महिला व बालकल्याण समितीसाठी केशरबाई घुमरे व दोन विषय समित्यांसाठी चंद्रकांत शेजूळ व गटनेते बजरंग सोनवणे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. दोन वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. दहा मिनिटांचा अवधी छाणनीसाठी होता. सर्व अर्ज वैध ठरले. त्यानंतर दहा मिनिटांचा अवधी अर्ज माघारीसाठी दिला होता; परंतु चार समित्यांसाठी दाखल आठ अर्जांपैकी कोणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला समाजकल्याण समिती सभापतीची निवड झाली. भाजपच्या संतोष हंगे यांना ३४ तर राकॉच्या प्रदीप मुंडे यानां २५ मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काम पाहिले. उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, डेप्युटी सीईओ धनवंतकुमार माळी, तहसीलदार छाया पवार, रामेश्वर गोरे यांनी सहायक म्हणून काम पाहिले.
निवडी जाहीर होण्याअधीच निवनियुक्त सभापतींच्या समर्थकांनी न्याय भवनाबाहेर गुलालांची उधळण करत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. उपअधीक्षक गणेश गावडे तळ ठोकून होते. दंगलनियंत्रण पथक व तिन्ही ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीत युतीने ३४ तर राष्ट्रवादीने २५ मते घेतली होती. आ. जयदत्त क्षीरसागर गटाच्या सदस्या मंगल डोईफोडे सभापती निवडीवेळीही अनुपस्थित राहिल्या. राजेसाहेब देशमुख यांना आशा दौंड यांच्यामुळे एक मत अधिक मिळाले.
हा अपवाद वगळता युतीने ३४ मतांसह बाजी मारली तर राकॉला २५ मतांवरच समाधान मानावे लागले. महिला - बालकल्याण समितीच्या निवडीत भाजपच्या शोभा दरेकर यांच्या पारड्यात ३४ तर काकू- नाना आघाडीच्या केशरबाई घुमरे यांना २५ मते मिळाली.
दोन विषय समित्यांच्या निवडीत काँग्रेसच्या राजेसाहेब देशमुख यांना ३५ तर सेनेच्या युद्धजित पंडित यांना ३४ मते मिळाली. राकॉच्या चंद्रकांत शेजूळ यांना २४ तर गटनेते बजरंग सोनवणे यांना २५ मते पडली.
धस समर्थकांची ‘व्हिप’ डावलून भाजपला साथ
माजी मंत्री सुरेश धस यांच्या पाच सदस्यांच्या मदतीने भाजपने जि.प. ची सत्ता काबिज केली होती. सभापती निवडीतही धस समर्थकांनी एकही सभापतीपद न घेता भाजपला बिनशर्थ साथ दिली. राष्ट्रवादीने घड्याळ या चिन्हावर निवडून आलेल्या सर्व सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता; परंतु धस समर्थकांनी ‘व्हिप’ डावलून भाजपच्या पारड्यात आपली मते टाकली. त्यामुळे भाजपचे वर्चस्व राहिले.