युती फाटणार; आघाडी बिनसणार
By Admin | Updated: March 29, 2016 00:58 IST2016-03-29T00:10:30+5:302016-03-29T00:58:51+5:30
औरंगाबाद : सातारा-देवळाईतील मनपाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होण्याची शक्यता मावळण्याकडे आहे. तर दुसरीकडे काँगे्रस आणि

युती फाटणार; आघाडी बिनसणार
औरंगाबाद : सातारा-देवळाईतील मनपाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होण्याची शक्यता मावळण्याकडे आहे. तर दुसरीकडे काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील बिनसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच दोन्ही वॉर्डांतून सेना, भाजप, काँग्रेसला बंडखोरीची लागण होणार आहे.
सातारा- देवळाई हा काँग्रेसचा पारंपरिक गड असल्यामुळे राष्ट्रवादीने सोबत यावे. भविष्यात शहरात एखादी पोटनिवडणूक लागली तर तेथे काँग्रेसकडून राष्ट्रवादीला मदत केली जाईल, असे मत काँग्रेसच्या गोटातून व्यक्त होत आहे. तर राष्ट्रवादी या उधारीच्या राजकारणाला किती खतपाणी घालते, त्यावर आघाडीचे गणित आहे. भाजपने देवळाईतून उमेदवार निश्चित करून त्याचा अर्जही दाखल केल्यामुळे शिवसेनेनेदेखील पूर्ण तयारीनिशी दोन्ही वॉर्डांत उमेदवार देण्याचे ठरविले आहे. देवळाई या वॉर्डावर दोन्ही पक्ष दावा करीत असल्यामुळे युती फाटण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज मंंडळींनी पक्षांतर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या गोटात इन्कमिंग वाढल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. परिणामी राष्ट्रवादीला जवळ न करण्याच्या भूमिकेत काँग्रेस सध्या आहे. देवळाईतून राजू नरवडे, फिरोज पटेल यांच्यात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चुरस आहे. भाजपने अप्पासाहेब हिवाळे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेकडून हरिभाऊ हिवाळे देवळाईतून तर साताऱ्यातून पल्लवी गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. एमआयएमने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत.