मतदार यादीतून वगळल्याचा आरोप

By Admin | Updated: February 9, 2015 00:45 IST2015-02-09T00:36:18+5:302015-02-09T00:45:26+5:30

लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

Allegations of exclusion from the voters list | मतदार यादीतून वगळल्याचा आरोप

मतदार यादीतून वगळल्याचा आरोप



लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेच्या मतदार यादीतून अनेक मतदारांना वगळल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती सपना घुगे-पाटील यांनी केला असून, वगळण्यात आलेल्या मतदारांना यादीत पुन्हा स्थान द्यावे, या मागणीसाठी त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर रविवारी ठिय्या मांडला होता.
साकोळच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मतदार यादीतून अचानक तीनशे लोकांना वगळण्यात आले असून, ३०० नवीन लोकांना मतदार यादीत स्थान दिले आहे, असा आरोप आरोग्य सभापतींनी केला आहे. मात्र प्रशासनाने त्यांचा आरोप फेटाळून लावला असून, मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात नोंदविलेले आक्षेपच बोगस असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, आरोग्य सभापती सपनाताई घुगे-पाटील, राजकुमार घुगे-पाटील, विलास रामशेट्टे, रमेश लुल्ले, अरुण शेटकार, संजय भुरे, गुंडेराव भुरे, अ‍ॅड. सुरेश पाटील, कालिदास माने आदींनी मतदार यादीतून वगळल्याचा आरोप केला. प्रशासकीय इमारतीतील उपनिबंधक कार्यालयासमोर साकोळ येथील ग्रामस्थांनी दोन तास आंदोलन केले. मतदार यादीतून कसे वगळले आणि नवीन लोकांना कसे घेतले? विशेष म्हणजे मतदारयादीत समाविष्ट केलेल्या १३० मतदारांकडे जमीनही नाही, त्यांचा समावेश कसा केला, असा सवाल सपनाताई घुगे- पाटील यांनी केला. आमच्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यात यावी व मतदार यादीमध्ये स्थान देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
१३ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्या यादीत वगळलेल्या लोकांची नावे घेण्यात यावीत, असेही आक्षेपकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
आलेल्या ११० आक्षेपांपैकी मतदार यादीत समाविष्ट करण्यास तिघे पात्र आहेत. जे आक्षेप आहेत, ते बोगस आहेत. काही मयत व्यक्तींचीही त्यात नावे आहेत. आक्षेपावरील सह्या बोगस आहेत, असे उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील गजेंद्र देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Allegations of exclusion from the voters list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.