औरंगाबाद : नवीन शिकण्याची मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते, हेच बच्चेकंपनीने सिद्ध करून दाखविले. लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आयोजित ‘कलाविश्व’ कार्यशाळेत थ्री डी अॅनिमेशन प्लॅटफॉर्म साकारून त्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या तीनदिवसीय कार्यशाळेची सांगता आज झाली; पण आणखी काही दिवस मुदत वाढवायला पाहिजे होती, कारण आम्हाला आणखी नवनवीन कलाकृती शिकता आल्या असत्या, अशा अपेक्षा चिमुकल्यांनी व्यक्त केल्या, हेच या कार्यशाळेचे फलित ठरले. लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आयोजित कलाविश्व कार्यशाळेची शनिवारी सांगता झाली. शेवटच्या दिवशी विद्यार्थी थ्री डी अॅनिमेशन प्लॅटफॉर्म शिकले. नवीन काही शिकायला मिळणार याची उत्सुकता सर्वांमध्ये होती. प्रत्येकाने येताना सोबत स्केल, पेन्सिल, कलर्स, ब्रश, ए-३ साईज कार्डशीट, कात्री, फेविकॉल, जुन्या पुस्तकातील निरनिराळी चित्रे घरून कापून आणली होती. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ए-३ साईज कार्डशीटवर वरील बाजूस आकाश रंगविण्यास सांगितले होते. त्यानंतर खालील बाजूस जमीन रंगविली. यानंतर कार्ड मधोमध फोल्डिंग करून जमिनीवर विविध प्राणी, जनावरे, शेती, झाडे, घर, इमारती, गाडी, कार, कार्टून थ्री डायमेन्शनप्रमाणे चिकटविण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी कल्पकतेचा वापर करीत आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य चितारले व आकाशात मुक्तपणे पक्षी विहरतानाचे चित्र चिकटविले. जेव्हा कलाकृती पूर्ण झाली आणि समोरील बाजूने ती पाहिली, तर या कलाकृतीला थ्री डीसारखा इफेक्ट आला होता. हे चित्र आपणच साकारले यावर विद्यार्थ्यांचा प्रथम विश्वासच बसला नाही. आपल्या पाल्याने थ्री डी इफेक्ट असलेले चित्र साकारले हे पाहून पालकही चकित झाले. उत्कृष्ट चित्र साकारणार्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली आणि या तीनदिवसीय कार्यशाळेची यशस्वीरीत्या सांगता झाली. कार्यशाळेत विद्यार्थी काय शिकले लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आयोजित कलाविश्व कार्यशाळेत पहिल्या दिवशी पेन स्टँड, दुसर्या दिवशी कलर्स पेपर बॅग, तिसर्या दिवशी ‘थ्री डी अॅनिमेशन लॅटफॉर्म’ बनविले.
थ्री डी अॅनिमेशन प्लॅटफॉर्म साकारण्यात सारे रमले
By admin | Updated: May 11, 2014 00:11 IST