जिल्ह्यातील सर्वच सोनोग्राफी केंद्र व रुग्णालयांची होणार तपासणी
By Admin | Updated: March 20, 2017 23:22 IST2017-03-20T23:19:16+5:302017-03-20T23:22:22+5:30
जालना : शासकीय, अशासकीय सोनोग्राफी केेंद्रे, रूग्णालयांची विशेष पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे

जिल्ह्यातील सर्वच सोनोग्राफी केंद्र व रुग्णालयांची होणार तपासणी
जालना : जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय सोनोग्राफी केेंद्रे, रूग्णालयांची जिल्हा रूग्णालयाच्या विशेष पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेत सोनोग्राफी केंद्रासह सर्वच हॉस्पिटल्सचीही कसून तपासणी करण्यात येणार आहे. तसे शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. बुधवारपासून ही तपासणी गोपनीय होणार आहे. यात सर्वच प्रकारच्या रूग्णालयांचा समावेश आहे.
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे सोनोग्राफी केंद्रात झालेल्या स्त्रीभ्रूण हत्येच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गर्भलिंग निदान चाचणीस प्रतिबंध व्हावा म्हणून स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून अनधिकृतपणे सोनोग्राफी सेंटर चालविणाऱ्यांवर छापे टाकून तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ३६ अशासकीय तर ४८ शासकीय नोंदणीकृत गर्भपात केंद्रे आहेत. सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्राची दर तीन महिन्याला तपासणी करण्यात येते. २००७ ते आजपर्यंत जिल्ह््यातील एकूण दोषी आढळलेल्या २१ सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्यात करण्यात आली आहे. १४० रूग्णालये आहेत.
पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कोणत्याही नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रातील डॉक्टर किंवा अन्य कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष (जाहिरात देणे, मध्यस्थी करणे) कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तशी माहिती देणाऱ्या व्यक्तीस संबंधितावर न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर २५ हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येईल. जिल्ह््यात सन २०१३ वर्षात एक हजार मुलांमागे ८८६ मुलींचे लिंग गुणोत्तराचे प्रमाण होते तर २०१४ मध्ये९०० मुली, २०१५ मध्ये ८७९ तर २०१६ मध्ये ९०४ मुलींचे प्रमाण आहे. या तपासणी पथकात आरोग्य विभाग, महसूल विभाग, अन्न व औषधी प्रशासन तसेच पोलिसांचा समावेश असणार आहे.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एकूण १४० रूग्णालयांची तपासणी करण्यात येणार आहे. यात सर्वच प्रकारच्या रूग्णालयांचा समावेश असणार आहे. यासाठी पथकाची स्थापना करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)