जिल्ह्यातील सर्व शाळा सर्वसाधारण क्षेत्रात !
By Admin | Updated: May 9, 2017 23:47 IST2017-05-09T23:42:09+5:302017-05-09T23:47:20+5:30
उस्मानाबाद : शासनाने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात बदल केला आहे. जिल्ह्यातील एकही शाळा अवघड क्षेत्रात मोडत नसल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा सर्वसाधारण क्षेत्रात !
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : शासनाने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात बदल केला आहे. त्यानुसार त्यानुसार अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा निश्चित निश्चित करून शिक्षकांचे आॅनलाईन प्रस्ताव मागवून १५ मे नंतर प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. असे असतानाच जिल्ह्यातील एकही शाळा अवघड क्षेत्रात मोडत नसल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम विभागाकडून सूचविण्यात आलेल्या ४९ शाळांची यादी वरिष्ठांनी फेटाळली आहे. त्यामुळे आता गुरूजींची सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेतून सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत बदली होणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून चालत आलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात यावेळी शासनाकडून बदल करण्यात आला आहे. या धोरणानुसार अवघड आणि सर्वसाधारण अशा दोन क्षेत्रात शाळांचा समावेश करून बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी पात्र शिक्षकांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. दरम्यान, शासनाने हे धोरण जाहीर केल्यापासून ते आजतागायत काही शिक्षक संघटनाकडून या धोरणाला विरोध होत होता. त्यामुळे ही बदली प्रक्रिया चांगलीच चर्चेत आली होती. असे असतानाच दुसरीकडे जि.प. शिक्षण विभागाकडून शासन निर्देशानुसार प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत त्या-त्या तालुक्यातील अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यात आल्या होत्या. बहुतांश तालुक्यांतून ज्या गावात एसटी बसेस जात नाही, अशा शाळांचा समावेश अवघड क्षेत्रात केला होता. त्यामुळे एकेका केंद्रातील सर्वच शाळा अवघड क्षेत्रात आल्या होत्या. ही संख्या तीनशेच्या घरात गेली होती. दरम्यान, या शाळांची फेर तपासणी करण्यात आली असता, ही संख्या १०९ पर्यंत खाली आली. दरम्यान, जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आला. त्यानुसार संबंधित यंत्रणेने रस्ते, दळणवळणाची साधने विचारात घेवून १०९ पैकी ४९ शाळा अवघड क्षेत्रात असल्याचे निश्चित करून तसा अहवाल सादर केला. दरम्यान, या ४९ शाळांची पुन्हा तपासणी केली असता, एकही शाळा अवघड क्षेत्रात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे १५ मे नंतर होणाऱ्या बदल्या सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेत होणार आहेत. ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.