आघाडीपेक्षा युतीलाच दुभंगल्याचा फटका

By Admin | Updated: September 30, 2014 01:27 IST2014-09-30T00:55:16+5:302014-09-30T01:27:56+5:30

परभणी: राज्याच्या राजकारणातील इतिहासामध्ये २०१४ च्या निवडणुकीतील सर्वाधिक धक्कादायक घटना ठरलेल्या शिवसेना- भाजपा युती तुटण्याच्या व काँग्रेस- राष्ट्रवादी

The all-round match of the all-round knock | आघाडीपेक्षा युतीलाच दुभंगल्याचा फटका

आघाडीपेक्षा युतीलाच दुभंगल्याचा फटका


परभणी: राज्याच्या राजकारणातील इतिहासामध्ये २०१४ च्या निवडणुकीतील सर्वाधिक धक्कादायक घटना ठरलेल्या शिवसेना- भाजपा युती तुटण्याच्या व काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी दुभंगल्याचा आघाडीपेक्षा युतीलाच फटका अधिक बसणार असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आले आहे.
शिवसेना- भाजपाची २५ वर्षांची युती व काँग्रेस- राष्ट्रवादीची १५ वर्षांची आघाडी २५ सप्टेंबर रोजी तुटली. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या मदतीने चारही पक्षांनी सत्तेतील पदे हस्तगत केली. परंतु, महत्वाकांक्षा वाढल्याने एकमेकाला कमी लेखण्याचा प्रयत्न झाला. यातूनच अंतर्गत धुसफूस वाढली परिणामी आघाडी व युती तुटली. त्यामुळे चारही पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात पडले असून ‘आयाराम-गयाराम’ची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली. या सर्व पार्श्वभूमीवर २०१४ ची विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याने बहुमत कोणाला मिळेल, हे सांगणे कठीण आहे.
आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीला एकमेकांचे कमजोर दुवे माहित आहेत. तर शिवसेना- भाजपाला त्यांच्यामधील अंतर्गत कमकुवत बाजू माहिती आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली. त्यानंतर सोमवारी अर्जांची छाननी ही झाली. आता १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडतील. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील. या सर्व पार्श्वभूमीवर नेहमीच चर्चिला जाणारा विषय म्हणजे काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी का तुटली? शिवसेना-भाजपाची युती का दुभंगली? याला जबाबदार कोण? या सर्व अनुषंगाने ‘लोकमत’ने सोमवारी परभणी शहरात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या निकालाअंती परभणीकरांनी आघाडी व युती तुटल्याचा सर्वाधिक फटका युतीलाच बसणार असल्याचे सांगितले. यामध्ये १६ टक्के नागरिकांनी शिवसेनेला तर ३६ टक्के नागरिकांनी भाजपाला व ४८ टक्के नागरिकांनी दोन्ही पक्षाला फटका बसणार असल्याचे सांगितले. हाच प्रश्न आघाडीबाबत केला असता ४२ टक्के लोकांना काँग्रेसला आघाडी दुभंगल्याचा फटका बसेल, असे वाटते. तर ४२ टक्के लोकांना दोन्ही पक्षांना फटका बसेल, असे वाटते. १६ टक्के नागरिकांनी राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याचे सांगितले. २५ वर्षांची शिवसेना-भाजपाची युती तुटण्यास कोण कारणीभूत आहे ? असा सवाल केला असता केवळ १० टक्के नागरिकांनी शिवसेनेला जबाबदार धरले तर ४४ टक्के नागरिकांनी भाजपाला व ४६ टक्के नागरिकांनी दोघांनाही जबाबदार धरले. हाच प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत विचारण्यात आला असता २६ टक्के नागरिकांनी काँग्रेसला जबाबदार धरले तर ३८ टक्के नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि ३६ टक्के नागरिकांनी दोन्ही पक्षांना जबाबदार धरले. युती तुटल्याचे मुख्य कारण ४२ टक्के लोकांना मुख्यमंत्रीपद वाटते तर ३० टक्के लोकांना जागा वाटप हे कारण वाटते. २८ टक्के नागरिक दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव नसल्याने युती तुटल्याचे सांगतात. काँग्रेस-राष्ट्रवादीबाबतही असाच सवाल केला असता ४० टक्के नागरिकांना जागा वाटप हे कारण वाटते. तर ३४ टक्के लोकांना मुख्यमंत्रीपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली असल्याचे वाटते. २६ टक्के नागरिकांना दोन्ही पक्षामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे वाटते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The all-round match of the all-round knock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.