जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पिकांना जीवदान
By Admin | Updated: August 31, 2014 01:10 IST2014-08-31T00:57:18+5:302014-08-31T01:10:31+5:30
लातूर : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीपाची पिके तरली आहेत़

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पिकांना जीवदान
लातूर : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीपाची पिके तरली आहेत़ लातूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सर्वदुर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे ओढे दुथडी भरून वाहत आहेत़
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणीपातळीत तब्बल दीड मीटरने वाढ झाली आहे़ त्यामुळे लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न किमान तीन महिन्यांसाठी सुटणार आहे़ निलंगा तालुक्यातील कासारसिरसी येथील ओढ्यात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे़ जिल्ह्यात ४१़२४ मी़मी़ पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची नोंद चाकूर तालुक्यातील शेळगाव महसूल मंडळात १७० मी़मी़ झाली आहे़ निलंगा तालुक्यातील औराद शहजानी येथील तेरणा नदी वाहू लागली आहे़ उदगीर तालुक्यातील ४ तलावांना भगदाड पडले आहे़ लातूर, औसा, रेणापूर, जळकोट तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ दरम्यान, लातूर महानगरपालिकेच्या विविध कार्यालयात पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली आहे़ दिवसभर पाणी गळती सुरूच होती़ (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यात ४१़२४ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ त्यात सर्वाधिक पाऊस चाकूर तालुक्यात ७४ मि़मी़ झाला आहे़ शिरूरअनंतपाळ ५१़३३, निलंगा ४८़६३, उदगीर ४९़५७, रेणापूर ३६़५०, जळकोट ३३़ ५०, देवणी ३८, औसा २३़१४, लातूर तालुक्यात २८़८८ मि़मी़ पाऊस झाला आहे़ यावर्षीच्या पावसाळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे़ पिके कोमेजून जात असताना पावसाने दिलेला दिलासा शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरला आहे़
४लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाणीसाठा वाढला आहे़ जवळपास दीड मीटरने पाणी पातळीत वाढ झाली असून, लातूरकरांना तीन महिने पुरेल इतके पाणी सध्यातरी उपलब्ध झाले असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आऱएस़ सोनकांबळे यांनी दिली़ अजूनही मांजरा धरणात पाणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले़