औरंगाबादेतील सर्व क्वारंटाईन सेंटर बंद; यापुढे अँटिजन टेस्टवर राहणार सर्वाधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 05:53 PM2020-09-05T17:53:57+5:302020-09-05T18:14:53+5:30

क्वारंटाईन केंद्रे चालविण्यासाठी दररोज महापालिकेला १२ ते १५ लाख रुपये खर्च करावे लागत होते. 

All quarantine centers in Aurangabad closed; From now on, the emphasis will be on antigen testing | औरंगाबादेतील सर्व क्वारंटाईन सेंटर बंद; यापुढे अँटिजन टेस्टवर राहणार सर्वाधिक भर

औरंगाबादेतील सर्व क्वारंटाईन सेंटर बंद; यापुढे अँटिजन टेस्टवर राहणार सर्वाधिक भर

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेने उभारली होती ३२ केंद्रेरुग्ण नसल्यामुळे क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.

औरंगाबाद : कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी शहरात तब्बल ३२ ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारले होते. अत्याधुनिक अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आल्यानंतर हळूहळू क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांची संख्याही घटत होती. गुरुवारी रात्रीपासून शहरातील सर्व सेंटर्स बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. क्वारंटाईन करण्यासाठी रुग्णच नसल्याचे प्रशासक  आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाण्डेय यांनी नमूद केले की, रुग्ण नसल्यामुळे क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या चिकलठाणा येथील कोविड केअर सेंटरमध्ये बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. याठिकाणी आॅक्सिजन टँक बसविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सीएसआर फंडातून अत्याधुनिक सिटीस्कॅन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. एमजीएम, एमआयटी आणि किलेअर्क येथील सीसीसी अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. 

मार्च महिन्यात शहरात कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर महापालिकेने शासनाच्या निर्देशानुसार शहरात २ हजार नागरिक राहू शकतील एवढ्या क्षमतेचे ३२ क्वारंटाईन सेंटर तयार केले. प्रत्येक सेंटरवर शंभर ते दीडशे संशयित रुग्णांना तीन ते चार दिवस थांबविण्यात येत होते. 
कोरोना टेस्टसाठी थांबविण्यात आलेल्या नागरिकांना दोन वेळा जेवण, चहा, नाश्ता आदी सोयीसुविधा महापालिकेला द्याव्या लागत होत्या. क्वारंटाईन केंद्रे चालविण्यासाठी दररोज महापालिकेला १२ ते १५ लाख रुपये खर्च करावे लागत होते. 

औरंगाबादेत रुग्णसंख्या कमी; पण...
राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत औरंगाबाद शहरात रुग्णसंख्या कमी आहे. आतापर्यंत २३ हजार रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्येचा विस्फोट कधीही होऊ शकतो. नागरिकांनी आपल्या जबाबदारीचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे, असेही पाण्डेय यांनी नमूद केले. 

Web Title: All quarantine centers in Aurangabad closed; From now on, the emphasis will be on antigen testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.