माजलगावामध्ये सर्वपक्षीय निदर्शने
By Admin | Updated: July 6, 2014 00:21 IST2014-07-06T00:02:22+5:302014-07-06T00:21:25+5:30
माजलगाव : येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांना त्रास दिला जात आहे.

माजलगावामध्ये सर्वपक्षीय निदर्शने
माजलगाव : येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांना त्रास दिला जात आहे. येथील कर्मचारी विविध कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्यांची आर्थिक लूट करीत आहेत. तसेच अर्वाच्च भाषाही वापरतात. या सेतू केंद्रातील मनमानी कारभाराला कंटाळून शनिवारी सर्वपक्षीय निदर्शने करण्यात आली. शहरातून काढलेल्या मोर्चाने शहर दणाणून गेले होते.
येथील तहसीलमधील सेतू सुविधा केंद्र हे सर्वसामान्यांसाठी असुविधा केंद्र बनले आहे. तेथे दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. विविध प्रमाणपत्रांकरिता १०० ते १००० रुपये सर्वसामान्यांना मोजावे लागत आहेत. जो पैसा देईल त्यास तत्काळ प्रमाणपत्र दिले जाते. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने पैसे देण्यास टाळाटाळ केली अथवा नकार दिल्यास येथील दलाल व कर्मचारी त्यांना नियम सांगून प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब करतात.
येथे काम करणारे कर्मचारीही विद्यार्थ्यांना उद्धट बोलून त्यांच्यावर धावून जाण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. शुक्रवारी माकपचे शिवाजी कुऱ्हे हे एका सर्वसामान्य व्यक्तीला प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्रात घेऊन गेले होते. तेथील कर्मचारी सय्यद जावेद व त्यांच्या सहकार्यांनी आलेल्या सर्वसामान्य व्यक्तीसह कुऱ्हे यांच्याशी उद्धट वर्तन केले. येथील सेतू सुविधा केंद्रात नेहमीच सर्वसामान्यांना अशी वागणूक दिली जात असल्याने संताप व्यक्त केला जात होता. शुक्रवारी हा अनुभव कुऱ्हे यांना आल्यानंतर त्यांनी याची माहिती सर्वांना दिली. नंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन शनिवारी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय नेते शिवाजी चौकात एकत्र आले. त्यानंतर त्यांनी घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर मोर्चा नेला.
या मोर्चामध्ये दयानंद स्वामी, डॉ. भगवान सरवदे, विलास जावळे, शिवाजी कुऱ्हे, तुकाराम येवले, गोरख टाकणखार, नारायण होके, राजेंद्र होके, मोहन जाधव, अजय सोळंके, राजेश घोडे, विष्णुदास करवा, अॅड. डाके, सय्यद रज्जाक, शेख अहमद, मनोज फर्के, शिवमूर्ती कुंभार, राकेश जाधव, नाना भिसे, ज्योतीराम पांढरपोटे, विलास नेमाने, अभिजीत कोंबडे, बाळासाहेब डुकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विद्यार्थी, शेतकरी, नागरिक यांनी मोर्चात सहभाग घेतला होता.
तहसील कार्यालयासमोर मोर्चा गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार अरुण जराड यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावर विचार करण्यात येईल, असे जराड म्हणाले. (वार्ताहर)