तीर्थक्षेत्र तुळजापुरातील सर्वच अनुदान रकमेची चौैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 00:18 IST2017-04-08T00:13:25+5:302017-04-08T00:18:00+5:30
तुळजापूर :अनुदान रकमेची चौकशी करावी, घरकुल घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

तीर्थक्षेत्र तुळजापुरातील सर्वच अनुदान रकमेची चौैकशी करा
तुळजापूर : नगर परिषदेच्या यात्रा अनुदानात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल यांनी गैरव्यवहार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा वाट्टेल तसा उधळण्याला पायबंद घालण्यासाठी विद्यमान नगराध्यक्षांना पदच्युत करून आतापर्यंत मिळालेल्या सर्व अनुदान रकमेची चौकशी करावी, घरकुल घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील पालिकेला शासनाकडून आलेल्या सन २०११-१२ मधील यात्रा अनुदान रकमेत अपहार झाल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांच्या वतीने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात सन २०११-१२ ते २०१५-१६ मधील यात्रा अनुदानाची चौकशी करण्यात यावी, आयएचएसडीपी घरकुल, १ कोटी ९ लाख रुपयांचे पेट्रोल, पाणीपुरवठा साहित्य खरेदी, सुनील प्लाझा बीओटी प्रकरण, अंदाजे ५१ कोटी रुपये लेखा परीक्षण अहवालानुसार झालेला अपहार, मोकाट जनावरे पकडण्यासाठी केलेल्या १३ लाख ६५ हजार रुपये खर्च यासह वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींबाबत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत इ. मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर जि.प.सदस्य धीरज पाटील, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, माजी नगरसेवक नागनाथ भांजी, शिवसेना शहराध्यक्ष सुधीर कदम, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, नगरसेवक अमर मगर, सचिन पाटील, सुनील रोचकरी, अपर्णा नाईक, आरती इंगळे, शारदा भोसले, भारत कदम, विपीन शिंदे, गुलचंद व्यवहारे, अमोल कुतवळ, आनंद जगताप, अजय साळुंके, रणजित इंगळे, आनंद क्षीरसागर, माऊली भोसले, इंद्रजित साळुंके, बापूसाहेब नाईकवाडी, प्रतीक रोचकरी, लखन पेंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर प्रकरणी कठोर कारवाई न केल्यास आंदोलन व्यापक करण्याचा इशारा देण्यात आला.