सर्वच दलित नेत्यांनी ऐक्याची दिली साद
By Admin | Updated: January 15, 2016 23:55 IST2016-01-15T23:48:37+5:302016-01-15T23:55:23+5:30
औरंगाबाद : विद्यापीठगेट परिसरात गुरुवारी सायंकाळी विविध ८ व्यासपीठांवर बुद्ध-भीमगीतांचा गजर सुरू होता. रात्री ७.३० - ८.०० वाजेच्या सुमारास व्यासपीठांवर त्या-त्या पक्ष-संघटनांच्या नेत्यांचे आगमन झाले

सर्वच दलित नेत्यांनी ऐक्याची दिली साद
औरंगाबाद : विद्यापीठगेट परिसरात गुरुवारी सायंकाळी विविध ८ व्यासपीठांवर बुद्ध-भीमगीतांचा गजर सुरू होता. रात्री ७.३० - ८.०० वाजेच्या सुमारास व्यासपीठांवर त्या-त्या पक्ष-संघटनांच्या नेत्यांचे आगमन झाले तेव्हा सभामंडपासमोरचा नूर एकदम पालटला. गाण्यांचे बोल थांबले अन् नेत्यांनी माईकचा ताबा घेतला. प्रत्येकाचा एकच घोष, आम्ही विद्यापीठ नामांतरासाठी अमुक केले, तमुक केले... एवढेच नव्हे, तर ते लाचार झाले... त्यांनी चळवळ दावणीला बांधली... अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या... असे असले तरी मात्र सर्वच नेत्यांनी ‘निळ्या झेंड्याखाली जनतेने एकत्र यावे’, असा सूर आळवला हेही नसे थोडके!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या २२ व्या वर्धापन दिन सोहळ्याला कधी नव्हे ती यंदा अलोट गर्दी उसळली होती. रात्री ११ वाजेपर्यंत गर्दीने आजवरचा उच्चांक मोडला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक आंबेडकर अनुयायी विद्यापीठगेटसमोर तथागत गौतम बुद्ध, शहीद स्मारक आणि बाजूला बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर दिसत होती. बाबासाहेबांच्या पुतळ्यालगतच पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्या व्यासपीठावर गंगाधर गाडे यांनी सभेला संबोधित केले. या व्यासपीठाच्या मागे आंबेडकर महाविद्यालय कर्मचारी निवासस्थान मैदानावर युथ रिपब्लिकन पार्टीचे नेते मनोज संसारे यांची सभा झाली. ‘अजिंठा’ या मिलिंद विज्ञान महाविद्यालय मुलांचे वसतिगृह परिसरात भारतीय जनता पक्षाचे भव्य व्यासपीठ होते. त्या व्यासपीठावर गायक अभिजित कोसंबी आणि प्रसेनजित कोसंबी यांनी भीमगीते सादर केली. ८ वाजेच्या सुमारास व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. अतुल सावे, शिरीश बोराळकर, नगरसेवक राजू शिंदे, प्रमोद राठोड, डॉ. भागवत कराड आदींचे आगमन झाले. विद्यापीठगेटच्या मागे कुतुबपुरा परिसरात रिपब्लिकन सेनेचे व्यासपीठ होते. तेथे पक्षाध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी- बहुजन जनतेने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या वीरांना मानवंदना म्हणून या परिसरात स्मारक उभारण्याचा मानस बोलून दाखविला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय परिसरात रिपब्लिकन पक्षाचे भव्य व्यासपीठ होते. या व्यासपीठावर प्रख्यात गायक प्रतापसिंग बोदडे, शाहीर सावदेकर, कुणाल वराळे, अमरावती येथील गायक वानखेडे यांनी एकापेक्षा एक प्रबोधनात्मक भीमगीते सादर केली. या व्यासपीठावर रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांचे आगमन झाले. व्यासपीठावर शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, रिपब्लिकन नेते गौतम भालेराव, दौलत खरात, माजी आ. अनिल गोंडाने, पप्पू कागदे, कांतीकुमार जैन, संजय ठोकळ, किशोर थोरात, श्रावण गायकवाड, विजय मगरे, सुंदर साळवे, प्रकाश कांबळे, प्रा. सुनील मगरे, नागराज गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम होते, तर सूत्रसंचालन मिलिंद शेळके यांनी केले. यावेळी रिपाइं कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरील उपस्थित सर्वच नेत्यांचे एका भव्य पुष्पहाराने स्वागत केले.