लातूर : पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी रंगपंचमीनिमित्त पारंपरिक रंग न वापरता कोरड्या रंगाची उधळण करून तरुणाईसह अबालवृद्धांनीही रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला. तसेच प्रदूषण विरहित रंगांचा वापर करून या रंगपंचमीला एक अनोखा संदेश दिला.पारंपरिक पद्धतीनुसार वारेमाप पाणी व रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली जात होती़ परंतू यावर्षी दुष्काळात सापडलेल्या लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई एवढी भेडसावली आहे की, घागरभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे़ पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाल्याने लातूरकरांना कोरडा रंग खेळण्याशिवाय पर्यायच नव्हता़ दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाजारात सर्वाधिक कोरडे रंग विक्रीसाठी आले होते़ लातूरच्या तरूणाईने कोरडा रंग खेळून पाणी बचत केली़ रंगपंचमीला कोरडा रंग खेळावा, पाणी बचत करावी, असा संदेश विविध सामाजिक संस्था, संघटनांनी केलेल्या आवाहनाला तरूणाईने प्रतिसाद दिला़ शहरात विविध ठिकाणी कोरड्या रंगाची उधळण करीत असताना तरूणाईचा जल्लोष दिसून आला़ लातूर शहरातील पीव्हीआर चौक, दयानंद गेट, शिवाजी चौक, अशोक हॉटेल, गांधी चौक, हनुमान चौक, गंजगोलाई, विवेकानंद चौक, औसा हनुमान, राजीव गांधी चौक, रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड या भागात पाण्याविना कोरड्या रंगाची उधळण करून रंगपंचमी साजरी झाली. (प्रतिनिधी)
कोरड्या रंगात रंगले सारे...
By admin | Updated: March 29, 2016 00:45 IST