स्वच्छता प्रश्नावर सारेच हतबल
By Admin | Updated: June 14, 2017 00:28 IST2017-06-14T00:23:54+5:302017-06-14T00:28:46+5:30
नांदेड: शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व अस्वच्छता संकटात महापालिका पदाधिकाऱ्यांसह प्रशासनही हतबल ठरले आहे़

स्वच्छता प्रश्नावर सारेच हतबल
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व अस्वच्छता संकटात महापालिका पदाधिकाऱ्यांसह प्रशासनही हतबल ठरले आहे़ पदाधिकारी प्रशासनाकडे तर विरोधक सत्ताधाऱ्यांकडे स्वच्छता प्रश्नी बोट दाखवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत़ याचा फटका मात्र सर्वसामान्य शहरवासियांना बसत असून शहरापुढे रोगराईचे मोठे संकट आ वासून पुढे उभे आहे़
स्वच्छतेची कोणतीही पर्यायी व्यवस्था न करताच एटूझेडला ३१ मार्च रोजी नांदेडमधून कार्यमुक्त करण्यात आले़ तत्कालीन आयुक्त समीर उन्हाळे यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेच्या ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची रवानगी ही स्वच्छता मजूर या मूळ पदावर केली होती़ मात्र यातील किती कर्मचारी मूळ पदावर गेले हे स्वच्छता विभाग आजपर्यंतही ठामपणे सांगू शकला नाही़ बहुतांश कर्मचाऱ्यांनी राजकीय व प्रशासकीय दबावातून आपली मूळ नियुक्ती स्वीकारलीच नाही हे वास्तव आहे़ याचा फटका शहराला तीन महिन्यांपासून भोगावा लागत आहे़ स्वच्छता विभागाने यावर तोडगा म्हणून कंत्राटी मजूर घेतले खरे मात्र त्यातही कागदावरील मजुरांची संख्याच अधिक आहे़ त्यामुळे कागदावर झालेली स्वच्छतेची कामे प्रत्यक्षात झालीच नाहीत़ महापालिकेत स्वच्छता देयकांमध्ये प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाला मिळाल्याने त्यावर ‘ब्र’ काढण्यास कुणीही तयार नाही़ पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर रस्त्यावरील घाण घरात शिरल्यानंतर मात्र विरोधकांनी आम्ही काही तरी करीत आहोत हे दाखविण्याचा १२ जून रोजी प्रयत्न केला़ त्यात सत्ताधाऱ्यांनीही त्याच पद्धतीचा अवलंब करीत आम्हीही मागे नसल्याचे दाखवून दिले़
त्यात कचरा उचलण्यासाठी भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर चोरीचे असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महापालिकेचे स्वच्छता काम करणारे ट्रॅक्टर जप्त केले़ हे प्रकरण १३ जूनपर्यंत चालले़ त्यामुळेही शहरातील अस्वच्छतेत वाढच झाली़ अखेर नूतन आयुक्त गणेश देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर आधी स्वच्छता अशी भूमिका घेत कामाला सुरूवात केली़ त्यात १३ जून रोजी प्रादेशिक परिवहन विभागाशी चर्चा करून ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर सोडविले़ त्यानंतर आता रात्रपाळीत काम करून कचऱ्याचे ढिगारे उचलण्याचे आदेश दिले़ त्यामुळे येत्या दोन- तीन दिवसांत हा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास आयुक्त देशमुख यांनी व्यक्त केला़ तसेच शहर स्वच्छतेसाठी प्राप्त निविदाधारकांनाही उद्या १४ जून रोजी चर्चेस बोलावण्यात आले आहे़ या चर्चेनंतर स्वच्छता निविदेबाबतही निर्णय होण्याची अपेक्षा आहे़