दारुचा काळाबाजार; मद्यपि परेशान, महिलांनी केले दारुबंदीचे स्वागत
By Admin | Updated: April 4, 2017 23:12 IST2017-04-04T23:09:55+5:302017-04-04T23:12:58+5:30
लातूर : महामार्गालगत ५०० मीटर अंतरावर असलेल्या २१० पैकी २०५ दारूची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे काही चालू असलेल्या परमिट रुममधून दारूचा काळाबाजार होत आहे.

दारुचा काळाबाजार; मद्यपि परेशान, महिलांनी केले दारुबंदीचे स्वागत
लातूर : लातूर शहरात राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटर अंतरावर असलेल्या २१० पैकी २०५ दारूची दुकाने न्यायालयाच्या आदेशाने बंद झाली आहेत. त्यामुळे काही चालू असलेल्या परमिट रुममधून दारूचा काळाबाजार होत आहे. चढ्या दराने दारू विकली जात आहे. यामुळे मद्यपि परेशान झाले असून, गृहिणी मात्र न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करीत आहेत. कायमस्वरुपी दारू दुकाने बंद करावीत, अशा प्रतिक्रिया महिला वर्गातून उमटल्या आहेत.
लातूर शहरात पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे मद्यपिंना सध्या दारू मिळणे कठीण झाले आहे. जे चार-दोन दुकाने चालू आहेत, त्या दुकानांतून चढ्या दराने दारूची विक्री केली जात आहे. एका ब्रँडची किंमत १५० रुपये असेल तर ती ३५० रुपयांना विकली जात आहे. यामुळे मद्यपिंच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. लातूर शहरातील सुभाष चौकातील एक वाईन शॉप तांत्रिक मुद्दे उपस्थित करून मंगळवारी उघडण्यात आले. तेव्हा मद्यपिंनी दारू खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.