आकाशवाणी चौकाचा ‘श्वास’ अखेर मोकळा
By Admin | Updated: May 12, 2016 00:54 IST2016-05-12T00:08:30+5:302016-05-12T00:54:08+5:30
औरंगाबाद : वाहतुकीची कोंडी होत असल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी आकाशवाणी चौकात (महात्मा बसवेश्वर चौक) बॅरिकेडस् उभे करून चौक बंद केला होता.

आकाशवाणी चौकाचा ‘श्वास’ अखेर मोकळा
औरंगाबाद : वाहतुकीची कोंडी होत असल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी आकाशवाणी चौकात (महात्मा बसवेश्वर चौक) बॅरिकेडस् उभे करून चौक बंद केला होता. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची ‘मुस्कटदाबी’ होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडस् काढून चौक खुला केला.
विशेष म्हणजे पोलिसांनी हे बॅरिकेडस् महेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्याला आडवे लावून तिकडे जाणारी वाहतूक एकेरी केली आहे. यामुळे त्या भागातून येणारी वाहने थेट जालना रोडवरील वाहतुकीची कोंडी करणार नाहीत. जालना रोड हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील जवळपास अर्धे लोक दिवसभरातून किमान एक वेळा तरी या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे पोलीसही याच रस्त्यावरील वाहतुकीकडे जास्त लक्ष ठेवून असतात. तरीही वाहनांची प्रचंड वर्दळ, जागोजागी झालेले अतिक्रमण आणि विविध अडथळ्यांमुळे या रस्त्यावर सतत वाहतुकीचा खोळंबा झालेला असतो. वाहतुकीची हीच कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी आकाशवाणी येथील हा चौक मध्यभागी बॅरिकेडस् उभे करून बंद केला होता. त्यामुळे जालना रोडवर सेव्हन हिल उड्डाणपुलाकडून मोंढा नाका उड्डाणपुलाकडे जाणारी आणि मोंढा उड्डाणपुलाकडून सेव्हन हिल उड्डाणपुलाकडे येणारी वाहने सुसाट धावू लागली होती.
पोलिसांच्या या बॅरिकेडस्चा सर्वात जास्त फटका बसला तो पादचाऱ्यांना. वाहने सुसाट धावत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरूनच जावे लागत होते. विशेष म्हणजे अनेकदा पादचाऱ्यांना सुसाट वाहनांमुळे रस्ताही ओलांडता येत नव्हता. त्यामुळे अनेक नागरिकांनी हे बॅरिकेडस् काढण्याची मागणी केली होती. यासंबंधी ‘हॅलो लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बुधवारी वाहतूक पोलिसांनी हे बॅरिकेडस् काढले आणि आकाशवाणी चौकाचा श्वास मोकळा केला.