अकॅडेमिक स्टाफ कॉलेजचे नामांतर
By Admin | Updated: September 1, 2014 00:45 IST2014-09-01T00:36:46+5:302014-09-01T00:45:07+5:30
शातील स्टाफ कॉलेजेसच्या नामांतरचा निर्णय हा १० आॅक्टोबरपासून अंमलात येणार आहे.

अकॅडेमिक स्टाफ कॉलेजचे नामांतर
विजय सरवदे, औरंगाबाद
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियंत्रणाखाली चालणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अकॅडेमिक स्टाफ कॉलेजसारखे (विद्या प्रबोधिनी) देशभरात ६६ स्टाफ कॉलेजेस असून, यापैकी यापुढे यातील ६१ कॉलेजेसला मनुष्यबळ विकास केंद्र तर उर्वरित ५ कॉलेजेसना क्षेत्रीय क्षमता विकास केंद्र म्हणून ओळखले जाईल. देशातील स्टाफ कॉलेजेसच्या नामांतरचा निर्णय हा १० आॅक्टोबरपासून अंमलात येणार आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अकॅडेमिक स्टाफ कॉलेजला क्षेत्रीय क्षमता विकास केंद्र म्हणून दर्जा मिळावा, यासाठी सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचे अकॅडेमिक स्टाफ कॉलेजचे संचालक डॉ. अरुण खरात यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्टाफ कॉलेजेसमार्फत उद्बोधन वर्ग, उजळणी वर्ग आणि शॉर्ट टर्म कोर्सेस हे पहिल्यासारखेच सुरू राहतील.
मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने अशा स्टाफ कॉलेजेसच्या स्ट्रक्चरमध्ये संशोधनात्मकदृष्ट्या थोडाफार बदल केलेला आहे. ‘यूजीसी’चा कल आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाकडे आहे. बदलत्या काळाची गरज म्हणून अभ्यासक्रमात माहितीतंत्रज्ञानासारख्या विषयांचा समावेश करण्याचे धोरण ‘यूजीसी’ने अंमलात आणण्याचे ठरविले आहे. त्यानुसार विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांना माहितीतंत्रज्ञानाचे ज्ञान अद्ययावत करावे लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून स्टाफ कॉलेजेसही आपल्या अभ्यासक्रमात बदल करून उद्बोधन वर्गात प्राध्यापकांना मार्गदर्शन केले जाईल.