छावणीत आचारसंहितेची ऐशीतैशी
By Admin | Updated: January 6, 2015 01:12 IST2015-01-06T00:47:49+5:302015-01-06T01:12:43+5:30
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता धाब्यावर बसविली आहे. निवडणूक विभागाची कोणतीही परवानगी न घेता येथे प्रचाराच्या शेकडो

छावणीत आचारसंहितेची ऐशीतैशी
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता धाब्यावर बसविली आहे. निवडणूक विभागाची कोणतीही परवानगी न घेता येथे प्रचाराच्या शेकडो मोठमोठ्या कमानी, होर्डिंग्ज आणि झेंडे लावण्यात आले आहेत. घराघरांवर स्टिकर्स आणि पोस्टर्स चिकटविले जात आहेत. छावणी परिषदेचे अधिकारी आणि निवडणूक विभाग मात्र, याविषयी मूग गिळून गप्प आहे.
छावणी परिषदेसाठी ११ जानेवारी रोजी मतदान होत आहे. परिषदेसाठी सात वॉर्डांमध्ये यावेळी तब्बल ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाचा दिवस जवळ आल्यामुळे आता येथील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवारांनी मोठमोठ्या कमानी, होर्डिंग्ज, झेंडे आणि इतर प्रचार साहित्याचा वापर केला जात आहे. आदर्श आचारसंहितेनुसार कोणत्याही उमेदवाराला निवडणूक काळात होर्डिंग्ज, कमान किंवा झेंडे लावायचे असतील तर त्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी ही परवानगी देण्याचे अधिकार छावणी परिषद प्रशासनाकडे सोपविण्यात आलेले आहेत; परंतु याठिकाणी परवानगी न घेताच होर्डिंग्ज, कमानी आणि झेंडे लावले आहेत. त्यामुळे छावणीत सध्या होर्डिंग्ज युद्ध लागल्याचे चित्र आहे. सद्य:स्थिती नेहरू चौक, पटेल चौक, होलीक्रॉस चौक, लक्ष्मी कॉलनी चौक यासह अगदी गल्लीबोळांमध्ये उमेदवारांचे शेकडो होर्डिंग्ज लागलेले दिसत आहेत. एवढेच नव्हे घराघरांवर झेंडे तसेच पोस्टर्स आणि स्टिकर्स चिकटविले जात आहेत. सद्य:स्थितीत छावणीच्या हद्दीत पाचशेहून अधिक होर्डिंग्ज आणि कमानी लागलेल्या आहेत. यातील अगदी बोटावर मोजण्याइतक्याच होर्डिंग्जसाठी परवानगी घेण्यात आलेली आहे. त्यातही नेमकी किती उमेदवारांनी शुल्क भरून होर्डिंग्जची परवानगी घेतली, याची माहिती छावणी परिषद प्रशासनाकडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिषदेतील काही कर्मचारी यातही आर्थिक व्यवहार करीत असल्याची चर्चा आहे. रीतसर शुल्क भरून परवानगी घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांना हम है ना, तुम लगालो होर्डिंग्ज, असे सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. हे अभय देण्यासाठी ठराविक रक्कम घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.