आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैशी

By Admin | Updated: October 12, 2014 00:39 IST2014-10-12T00:39:42+5:302014-10-12T00:39:42+5:30

संतोष धारासूरकर, जालना आदर्श आचारसंहितेचा जिल्हा प्रशासनाद्वारे डांगोरा पिटविला जात असतांना पाचही मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता खुंटीला

Aishi ki Taishi of Ideal Model Code | आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैशी

आदर्श आचारसंहितेची ऐशी की तैशी


संतोष धारासूरकर, जालना
आदर्श आचारसंहितेचा जिल्हा प्रशासनाद्वारे डांगोरा पिटविला जात असतांना पाचही मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता खुंटीला टांगल्याचे केविलवाणे चित्र समोर आले आहे.
जिल्ह्यातील सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या मातब्बरांकरीता या निवडणुका अक्षरश: प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. त्यामुळेच सर्व शक्तीनिशी हे मातब्बर निवडणूक लढवित आहेत. स्वत:सह त्यांचे कुटुंबिय, नातेगोते, आप्त व मित्रपरिवार सकाळपासून रात्रीपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. विशेष म्हणजे या लढतीत कोणतीही कमतरता ठेवायचीच नाही, असा संकल्प सुध्दा या मातब्बरांनी सोडला आहे. त्यामुळेच या लढतीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रतिस्पर्ध्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पैशांच्या थैल्या ओतल्या जात आहेत. टाचणी आणण्यापासून ते भाडोत्री कार्यकर्त्यांवर दररोज लाखो रुपये उधळले जात आहेत.
ग्रामीण भागात एका-एका गावास वातावरण निर्मितीसाठी किमान लाख रुपये, बैठका किंवा कॉर्नर सभांसाठी ५० हजार रुपये, पदयात्रांसाठी लाख रुपये तसेच छोट्या-मोठ्या नेत्यांच्या सभांना भाडोत्री कार्यकर्ते वाहनांद्वारे आणण्यासाठी अमाप पैसा खर्च होतो आहे. या जिल्ह्यात राज्य पातळीवरील पुढाऱ्यांच्या सभांना किमान १० लाख तर राष्ट्रीय पातळींवरील पुढाऱ्यांच्या सभांना किमान २० लाख रुपये खर्च होतो आहे. भाडोत्री कार्यकर्त्यांना दिवसामागे प्रत्येकी ३०० रुपये तर महिलांना २०० रुपये रोज हातावर टिकविला जातो आहे. या व्यतिरिक्त वाहनांना इंधनाव्यतिरिक्त अव्वाकी सव्वा दराने भाडे दिले जाते आहे. एका-एका वाहनांमागे ५ ते १० हजार रुपये खर्च होतो आहे.काही मतदारसंघातील मातब्बरांनी आपापल्या शेतातील आखाड्यांवर किंवा निवासस्थानांसह प्रचार कार्यालयाजवळ भट्ट्या पेटविल्या आहेत. त्याठिकाणी सकाळपासून ते रात्रीपर्यंत शेकडो कार्यकर्त्यांच्या पंक्ती उठत आहेत. चहा-पाणी, नाष्टा, जेवणावळ्यांवर सर्रास मोठा खर्च सुरु असून त्याव्यतिरिक्त धाब्यांवरील व्हेज-नॉनव्हेज जेवणांसह मद्यपानांकरीताही हजारो रुपये मोजले जात आहेत.गावा-गावांमधून प्रचार रथ दौडत आहेत. त्यावर पूर्णवेळ कार्यकर्ते तैनात करण्यात आले आहेत. रथासह त्या कार्यकर्त्यांचा खर्चही मोठा आहे. गावा-गावातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची मनधरणी करतांना काही पदाधिकारी व चाणाक्ष कार्यकर्त्यांना केवळ प्रचार ंयुध्दास जुंपण्याकरीता खिशात मातब्बरांना नव्याकोऱ्या नोटा त्यांच्या खिशात कोंबाव्या लागत आहेत. काहींनी टोकन पध्दत अवलंबिली आहे. त्याशिवाय हे चाणाक्ष कार्यकर्ते ‘चार्ज’च होत नाहीत, हे प्रकर्षाने दिसून आले आहे.
एकेक दिवस महत्वाचा आहे. त्यामुळेच तो दिवस आपलाच असावा, असा मातब्बरांनी चंग बांधला आहे. एकेक दिवस महागडा ठरतो आहे. त्यामुळे एक-एक दिवस ढकलला जावा यासाठी हे मातब्बर प्रयत्न करीत आहेत. परंतू खर्चाविना चर्चाच होत नाही, असा सर्वसाधारण चित्र असल्यामुळेच नाईलाजाने का असेना उमेदवारांना पैसा बाहेर काढावा लागतो आहे. येत्या चार दिवसात तर उमेदवारांचा दररोजचा खर्च लाखोंच्या घरात असेल, हे स्पष्ट आहे. कारण बुथनिहाय यंत्रणा, मतदारराजास नेण्या-आणण्याकरीता वाहने, स्थलांतर केलेल्या मतदारांना गावी आणण्यासाठी गाड्याघोड्यांसह अन्य खर्च लाखोंच्या घरात आहे.

Web Title: Aishi ki Taishi of Ideal Model Code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.