कार्गो सेवा विमानतळ प्राधिकरणच देणार
By Admin | Updated: December 22, 2015 00:11 IST2015-12-21T23:42:10+5:302015-12-22T00:11:10+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत एअर कार्गो सेवा एजन्सीमार्फत सुरू करण्यात येत असली तरी आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा मात्र,

कार्गो सेवा विमानतळ प्राधिकरणच देणार
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत एअर कार्गो सेवा एजन्सीमार्फत सुरू करण्यात येत असली तरी आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा मात्र, विमानतळ प्राधिकरण स्वत: हाताळणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा प्राधिकरण देणार आहे.
देशांतर्गत एअर कार्गो सेवा सुरू
आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, दिल्ली येथील एजन्सीला त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. जानेवारीत ही सेवा सुरू होणार आहे. दोन वेळा काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत एकाच कंपनीने सहभाग घेतला. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया काढण्याची वेळ आली. तिसऱ्यांदाही एकाच एजन्सीने त्यामध्ये सहभाग घेतला. अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण करून या देशांतर्गत एअर कार्गो सेवेसाठी या एजन्सीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महिनाभरात आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून या एजन्सीकडून कार्गो सेवा सुरू करण्यात येईल. कार्गो सेवेसाठी आवश्यक असलेली ट्रॉली, यंत्रसामुग्री, कर्मचारी एजन्सी देणार आहे.
देशांतर्गत एअर कार्गो सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेसाठी कस्टम क्लीअरन्स महत्त्वाचे ठरते. त्यामुळे अन्य कोणाकडून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा चालविण्याऐवजी प्राधिकरण स्वत: ही सेवा हाताळणार आहे. यामुळे प्राधिकरणाच्या उत्पन्न वाढीसही हातभार लागणार आहे. विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी ही माहिती दिली.