नगराध्यक्षपदाच्या निवडीचे लागले वेध
By Admin | Updated: July 4, 2014 00:18 IST2014-07-03T23:27:07+5:302014-07-04T00:18:30+5:30
भोकरदन : नगराध्यक्षांना दिलेली मुदत वाढ परत घेतल्याने आता भोकरदन नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या कोणाची वर्णी लागते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे़

नगराध्यक्षपदाच्या निवडीचे लागले वेध
भोकरदन : राज्यशासनाने नगराध्यक्षांना दिलेली मुदत वाढ परत घेतल्याने आता भोकरदन शहराच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या रेखाताई पगारे की राजू खिरे यांच्या पैकी कोणाची वर्णी लागते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे़
भोकरदन नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. अर्चनाताई मुकेश चिने ह्या सध्या नगराध्यक्षा आहेत. मात्र सोडतीमध्ये येथील नगराध्यक्षपद हे मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. या ठिकाणी मागासवर्गीय नगराध्यक्ष होणार आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मागासवर्गीय नगरसेवक निवडून न आल्याने साहजिकच अध्यक्षपद हे काँग्रेकडे जाणार आहे. काँग्रेसकडे मागासवर्गीय दोन नगरसेवक आहेत. दोन्ही नगरसेवक अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने सध्या दोघांत चांगलीच स्पर्धा सुरू झालेली आहे. नगरपरिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ कॉंग्रेसचे ७ व भाजपाचे १ असे एकूण १७ नगरसेवक आहेत. तर दोन्ही पक्षाकडे प्रत्येकी १ स्वीकृत सदस्य आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधात निवडणुका लढविलेल्या आहेत. त्याचे सख्य होईल हे आज सांगणे कठीण आहे. तरी सुध्दा दोन्ही काँग्रेसच्या विचाराने जर अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक झाली तर अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या रेखाताई पगारे किवा राजू खिरे यांची वर्णी लागेल. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शब्बीर कुरेशी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पालकमंत्री राजेश टोपे, पशुसवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, आ़ चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष अॅड. हर्षकुमार जाधव, मुकेश चिने, शफीक पठाण, सईद कादरी़ यांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला तर दोन्ही काँग्रेसची या निवडणुकीत मैत्री होऊ शकते़
मात्र केंद्रीय अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नागरी सत्कारामध्ये नगराध्यक्षा अर्चनाताई चिने यांचे पती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुकेश चिने व उपनगराध्यक्ष शफीकखॉ पठाण यांनी पुढाकार घेऊन सत्कार सोहळा आयोजित केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू आहे. याचा परिणाम नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे़
दरम्यान, निवडणुका होणार जाहीर होताच, भोकरदन शहरात राजकीय वातावरण गरम झाले आहे. राजकीय हालचालींना वेग वाढला असून, कोण कोणला गळात अडकवून संधी साधतो याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
अंबड : अंबडच्या नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याविषयी शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
अडीच वर्षापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस तर माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ही निवडणूक लढविली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने १० तर काँग्रेसने ७ जागी विजय मिळविला होता. या निवडणुकीवेळी ओबीसी महिला प्रवर्गासाठी अंबडचे नगराध्यक्षपद आरक्षित होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल काकासाहेब कटारे यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. अडीच वर्षांच्या कटारे यांच्या कारकीर्दीविषयी नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत.
आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंबडचे नगराध्यक्षपद महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. अंबड पालिकेतील एकूण १७ पैकी ९ सदस्य या महिला आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल काकासाहेब कटारे, वैशाली सुनील राऊत, वैशाली राजेश सावंत, ललिता जितेंद्र बुर्ले, मल्लिका शेख शाहेद, सुमन संजय साळवे या सहा महिला सदस्यांचा तर काँग्रेसतर्फे मीनाताई खुशालराव उदावंत, रामकुंवरबाई जगन्नाथ खरात, इरफाना बेगम शेख जाकेर या तीन महिला सदस्यांचा समावेश आहे. या सर्वच महिला सदस्यांना कायदेशीररित्या नगराध्यक्षपदाचे दावेदार मानण्यात येत आहे. पाच वर्षापूर्वी अडीच वर्षांच्या कालखंडानंतर पाच नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत काँग्रेसने अंबड नगरपालिकेत आपली सत्ता पुनर्प्रस्थापित केली होती. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहापैकी बहुतांश महिला नगरसेविका नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. नगराध्यक्षपदासाठी जरी महिला नगरसेविकांची नावे शर्यतीत दिसत असली तरी या निवडणुकांची सर्व सूत्रे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी खा.अंकुशराव टोपे, पालकमंत्री राजेश टोपे यांच्या तर त्यांच्या विरोधी गटाची सूत्रे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांच्या हाती आहेत. लवकरच होणाऱ्या या निवडणुकानंतर अंबडच्या नगराध्यक्षपदी कोणाची निवड होते याकडे सर्वसामान्यांचे आतापासुनच लक्ष लागले आहे एवढे मात्र खरे. (वार्ताहर)