शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी कर्मचारी

By Admin | Updated: July 28, 2014 01:01 IST2014-07-27T23:35:02+5:302014-07-28T01:01:16+5:30

हिंगोली : माहितीअभावी अनेक शेतकरी खरीप हंगामाचा पीकविमा काढत नाहीत. परिणामी नैसर्गिक आपत्तीत भरपाई मिळत नाही.

Agriculture workers to help farmers | शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी कर्मचारी

शेतकऱ्यांच्या मदतीला कृषी कर्मचारी

हिंगोली : माहितीअभावी अनेक शेतकरी खरीप हंगामाचा पीकविमा काढत नाहीत. परिणामी नैसर्गिक आपत्तीत भरपाई मिळत नाही. त्याचा विचार करून सेनगाव तालुका कृषी विभागाने तालुक्यात ९ बँकांच्या शाखेत विमा काढण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार आहेत.
खरीप हंगामाच्या पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत कास्तकारांना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत कमी आणि उच्च जोखीमस्तराचा विमा बिगरकर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणाऱ्यांनाही काढता येईल. विम्यात यंदा नैसर्र्गिक आपत्तींपासून अधिसूचित क्षेत्र पातळीवर विमा संरक्षण, राज्य शासनाद्वारे केलेल्या पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई, शिवाय चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदविले गेल्याससुद्धा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. भरपाईची हमी असताना माहितीअभावी किंवा विमा काढण्याच्या प्रक्रियेबद्दल बहुतांश शेतकरी अनभिज्ञ असतात. त्यामुळे विमा काढला जात नाही.
प्रामुख्याने त्याचा विचार करून सेनगाव तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला देण्यासाठी एखादा अधिकारी किवा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. सेनगाव तालुक्यातील एकूण ९ शाखांत कृषी विभागाचा कर्मचारी उत्पादकांना मदत करणार आहे. त्यात सेनगाव, पुसेगाव, पानकनेरगाव, पळशी, गोरेगाव, केंद्रा बु, आजेगाव, साखरा, कापडसिंगी येथील राष्ट्रीयीकृत बँकेचा समावेश आहे. येथील शाखेत अल्प व अत्यल्प भूधारकांना विमा हप्त्यात १० टक्के सवलत, अत्यल्प भूधारकांना ७५ टक्के सवलत, अल्प व अत्यल्प भूधारकांना इतर पिकांसाठी ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
मागील वर्षीपेक्षा यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपात उशिरा पेरण्या झाल्याने उत्पादनात घट होणार हे दिसत आहे. त्यामुळे भरपाईचा उपाय म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर.बी. हरणे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
खरीप हंगामातील पीक व विम्याची रक्कम
तालुका सर्वसाधारण विमा हप्ता अल्पभूधारक
कापूस २७५६ १८४७९ २४८०
सोयाबीन ६०२ १९९९२ ५४२
तूर ४६८ १३१९० ४२१
ज्वारी २९५ ८४२० २६६

Web Title: Agriculture workers to help farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.