कृषी विभागाचे मका बियाणे निघाले ‘वांझ’
By Admin | Updated: August 9, 2014 00:56 IST2014-08-09T00:33:49+5:302014-08-09T00:56:39+5:30
मका विकास कार्यक्रमांतर्गत एका खाजगी कंपनीमार्फत बियाणे वाटप केले; मात्र हे बियाणेसुद्धा वांझ निघाल्याने तिबार पेरणी केलेला शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे.

कृषी विभागाचे मका बियाणे निघाले ‘वांझ’
सय्यद लाल बाजार सावंगी
पहिली धूळ पेरणी, हलका पाऊस पडल्यावर घाई-घाईने दुबार पेरणी केली. हे बियाणे कुठे उगवले तर कुठे नाही. त्यामुळे बळीराजा आधीच चिंतेत होता, त्यातच उशिरा कृषी विभागाला अनुदान तत्त्वावरील बियाणे वाटपाची जाग आली आणि त्यांनी खुलताबाद तालुक्यात मका विकास कार्यक्रमांतर्गत एका खाजगी कंपनीमार्फत बियाणे वाटप केले; मात्र हे बियाणेसुद्धा वांझ निघाल्याने तिबार पेरणी केलेला शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे.
खुलताबाद तालुक्यातील पूर्व मंडळात ४० क्विंटल मका बियाणे वाटप करण्यात आले असून त्याची पेरणी ५०० एकरवर झाली असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. परिसरात पावसाचे आगमन उशिरा झाल्याने धूळ पेरणी वाया गेली. त्यानंतर हलका पाऊस पडला, बियाणे उगवणार नाही, असे वाटत असतानाही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यामुळे व्हायचे तेच झाले. उगवण चांगली झालीच नाही.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी, असा सल्ला देणाऱ्या कृषी विभागालाच यंदा उशिरा जाग आली. त्यांनी अनुदान तत्त्वावरील मका बियाणे चक्क जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाटप केले.
दुबार पेरणीत यश न आल्याने व अनुदान तत्त्वावर बियाणे मिळाल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी तिबार पेरणी करण्याचे धाडस केले. जमिनीत ओल चांगली होती, त्यामुळे मका तरारून उगवेल, असे सर्व शेतकऱ्यांना वाटत होते; मात्र यावेळी तर चक्क बियाणेच वांझ निघाले. त्यामुळे आधीच अवसान गळालेला बळीराजा आता पुरता मेटाकुटीला आला आहे. कारण; यापुढे बियाणे घेऊन पेरणी करण्याची ताकद आता त्याच्यात राहिली नाही. वर्षभर जमीन पडीक राहण्याची भीती निर्माण झाली
आहे.