उदगीरची कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त?
By Admin | Updated: April 22, 2016 00:31 IST2016-04-22T00:16:01+5:302016-04-22T00:31:15+5:30
उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी मंडळ बरखास्त करण्यात आल्याची चर्चा गुरुवारी शहरात जोरदार रंगली़ यावर जिल्हा उपनिबंधकांनी मौन पाळणे पसंत केले

उदगीरची कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त?
उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी मंडळ बरखास्त करण्यात आल्याची चर्चा गुरुवारी शहरात जोरदार रंगली़ यावर जिल्हा उपनिबंधकांनी मौन पाळणे पसंत केले असले तरी, शुक्रवारी याबाबत स्पष्ट सांगेन, असे सूचक संकेत त्यांनी दिले आहेत़
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह अन्य काही जणांनी तक्रारी केल्या होत्या़ बाजार समितीत विविध स्तरावर मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तसेच परवानग्या न घेताच वेगवेगळ्या योजना राबविल्याचा आरोप करण्यात आलेला आहे़ या तक्रारींची गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चौकश्या होत होत्या़ त्यानंतर चौकशी अहवालाच्या आधारे गुरुवारी बाजार समिती बरखास्त करण्यात आल्याची माहिती बाहेर आली़ परंतु, यास सायंकाळपर्यंत कोणीही अधिकृत दुजोरा दिला नाही़
याबाबत पणन महामंडळाचे उपसंचालक चंद्रकांत टिकुळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी बरखास्तीचे अधिकारी जिल्हा उपनिबंधकांना असल्याचे सांगून त्यांच्याकडून अद्याप तसा कोणताही अहवाल आला नसल्याचे म्हटले़ जिल्हा उपनिबंधक बी़एल़ वांगे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, यावर आज काहीही सांगू शकत नाही़ उद्या बोलेन, असे सांगून सूचक संकेत मात्र दिले़
आमदार सुधाकर भालेराव यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेली बाजार समिती बरखास्त झाल्याचे ठासून सांगताना त्याचे आदेश निघत असल्याचे सांगितले़ आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचेही ते म्हणाले़ सभापती शिवाजी हुडे यांनी याबाबत अधिकृत अशी कोणतीही सूचना अथवा माहिती आपल्याकडे आली नसल्याचे स्पष्ट केले़ (वार्ताहर)