अडीच लाख शेतकऱ्यांच्या दारापर्यंत कृषी योजना पोहोचल्या
By Admin | Updated: July 1, 2014 01:03 IST2014-07-01T00:35:56+5:302014-07-01T01:03:34+5:30
लातूर : लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात १८ लाख शेतकरी असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे़

अडीच लाख शेतकऱ्यांच्या दारापर्यंत कृषी योजना पोहोचल्या
लातूर : लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात १८ लाख शेतकरी असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे़ लातूर विभागाने आतापर्यंत अडीच लाख शेतकऱ्यांच्या बांधावर योजना पोहोचवल्या आहेत़ पॉली हाऊस, राष्ट्रीय फलोत्पादन, पीक प्रात्यक्षिके, नेट हाऊस, क्षेत्र विस्तार आदी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषीदिन म्हणून मंगळवारी साजरा होत आहे़ त्यानिमित्त जिल्हास्तरीय मेळावे घेऊन या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे़
मृग नक्षत्र कोरडे गेले आहे़ आर्द्रा नक्षत्रातही अद्याप पाऊस झाला नाही़ परिणामी यंदा फक्त २ टक्केच पेरण्या झाल्या आहेत़ जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ७० ते ८० मि़मी़ पाऊस झाल्यानंतर पेरण्या होऊ शकतात़ परंतु इतका पाऊस अद्याप झाला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात चर खोदण्यासाठी प्रोत्साहान देण्यात येत आहे़ चर खोदलेल्या शेतात जर ६० टक्के मि़मी़पाऊस झाला तर तेथे पेरणी करता येऊ शकते़ या अनुषंगाने शेतकऱ्यांना मंगळवारी होत असलेल्या मेळाव्यात माहिती दिली जाणार असल्याचे कृषी सहायक संचालक के.एन. देशमुख यांनी दिली़ लातूर विभागातील १८ लाख शेतकऱ्यांपैकी अडीच लाख शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून शंभर टक्के शेतकऱ्यांना या योजना माहित होण्यासाठी वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनापासून जनजागृती करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले़ शंभर, पन्नास टक्के अनुदानावर शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत़ त्यात ठिबक तुषार योजना, राष्ट्रीय फलोत्पादन योजना, अवजारे योजना, सिमेंट बंधारे, नाला बंधारे, खाजगी नर्सरी स्थापने, पॉलिहाऊस, पॅकिंग हाऊस, ग्रीन शेड-नेट हाऊस आदी योजनांचा समावेश आहे़ पिक उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत़ परंतु या योजनांची माहिती शेतकऱ्यांना होत नाही़ त्यामुळे लाभापासून शेतकरी वंचित राहतात़ गरजू व प्रयोगशिल शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाने जिल्हा मेळाव्यांचे आयोजन केले असल्याचे सहायक संचालक देशमुख यांनी सांगितले़
अध्यक्षांच्या उपस्थितीत मेळावा...
लातूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे़ जि़प़अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी, डेप्युटी सीईओ या मेळाव्यात कृषी योजनांची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देणार आहेत. जिल्हा परिषद व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी योजनांचा आढावाच यावेळी घेतला जाईल.