अग्रसेन चौकही बंद होणार
By Admin | Updated: May 11, 2016 01:01 IST2016-05-11T00:37:29+5:302016-05-11T01:01:41+5:30
औरंगाबाद : जालना रोडवरील आकाशवाणीजवळील चौकाप्रमाणेच आता लवकरच हॉटेल अॅम्बेसिडर बाजूचा अग्रसेन चौकही बंद होणार आहे.

अग्रसेन चौकही बंद होणार
औरंगाबाद : जालना रोडवरील आकाशवाणीजवळील चौकाप्रमाणेच आता लवकरच हॉटेल अॅम्बेसिडर बाजूचा अग्रसेन चौकही बंद होणार आहे. वाहतूक पोलिसांनी जळगाव टी-पॉइंट उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अपघात आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या दृष्टीने प्रयत्न चालविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी जळगाव टी-पॉइंट येथे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. अखेर या पुलाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या पुलाची पूर्वेकडील बाजू मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ उतरते, तर पश्चिमेकडील बाजू रामगिरी हॉटेलसमोर उतरते. रामगिरी हॉटेलपासून अवघ्या दोनशे फुटांवर अग्रसेन चौक आहे.
पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर चिकलठाण्याकडून पुलावरून येणारी वाहने उतारामुळे सुसाट वेगात अग्रसेन चौकात येतील. येथे आजचा सिग्नल आणि चौक कामय ठेवला, तर तिकडून येणाऱ्या पुलाच्या उतारावरील वाहनांच्या वेगामुळे अपघात होऊ शकतात. शिवाय चौकातील कोंडी पुलापर्यंत जाईल. ही बाब वाहतूक शाखा पोलिसांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे हा पूल सुरू होण्यापूर्वीच अग्रसेन चौक बंद करण्याची तयारी वाहतूक शाखा पोलिसांनी सुरू केली आहे. रस्ता दुभाजक टाकून हा चौक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सिडको एन-५ कडून येणाऱ्या वाहनांना एन-४ किंवा सेव्हन हिलकडे जायचे झाल्यास थेट पुलाखालून जळगाव टी-पॉइंटला वळसा घालून यावे लागणार आहे. औरंगाबाद शहर वाढत आहे. भविष्यात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जालना रोडवरील असे ठिकठिकाणी असलेले छोटे-मोठे चौक बंदच करावे लागणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.