कुलकर्णी यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ताळ्यावर!
By Admin | Updated: August 17, 2016 00:53 IST2016-08-17T00:17:42+5:302016-08-17T00:53:26+5:30
औरंगाबाद : महापालिकेने आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदासाठी दोन वेगवेगळ्या व्यक्तींना पगार देण्याची किमया केली आहे. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले

कुलकर्णी यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ताळ्यावर!
औरंगाबाद : महापालिकेने आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदासाठी दोन वेगवेगळ्या व्यक्तींना पगार देण्याची किमया केली आहे. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. सुहास जगताप मागील ११ महिन्यांपासून काम पाहत आहेत. याच पदासाठी १२ आॅगस्ट रोजी जयश्री कुलकर्णी यांना मागील ११ महिन्यांचा पगार, भत्ते देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. प्रशासनाच्या या अजब निर्णयाला सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी कडाडून विरोध केला आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने डॉ. जयश्री कुलकर्णी यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून पदोन्नती दिली. शासनानेही या पदोन्नतीला मंजुरी दिली. डॉ. कुलकर्णी यांच्या विरोधात सर्व डॉक्टरांनी बंडाचे हत्यार उपसल्याने त्यांना रजेवर जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, मनपाने या जागेवर शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मागविला. शासनाने डॉ. सुहास जगताप यांची आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर नेमणूक केली. मागील ११ महिन्यांमध्ये मनपाने कुलकर्णी यांना नियुक्तीच दिली नाही. मागील आठवड्यात कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवून १५ आॅगस्टला आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री कार्यालयाने मनपा आणि पोलीस आयुक्तालयाला ही बाब कळविली. मनपाने ताबडतोब कुलकर्णी यांना ११ महिन्यांचा थकीत पगार देण्याचा निर्णय घेतला. एकाच पदावर दोन व्यक्तींना प्रशासनाने पगार कसा काढला असा प्रश्न सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, काँग्रेसचे गटनेता भाऊसाहेब जगताप यांनी उपस्थित केला आहे. कुलकर्णी यांना आजपर्यंत मनपाने नियुक्ती का दिली नाही. घरी बसवून पगार कोणत्या नियमानुसार दिला. एकाच पदावर दोन वेगवेगळ्या व्यक्तींना पगार देता येऊ शकतो का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. कालपर्यंत कुलकर्णी यांना पगार न दिल्याने प्रशासनाची कोंडी झाली होती. आता पगार दिल्यानंतर नगरसेवकांनी वेगळी कोंडी केली आहे.