लस दिल्यानंतर प्रत्येकास ३० मिनिटे निरीक्षणात ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:51+5:302020-12-17T04:29:51+5:30
बायोवेस्टेजचे नियोजन : तीन खोल्या लागणार, केंद्रनिहाय तयारी औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लस देण्याबाबत प्रशासनाने तयारी केली ...

लस दिल्यानंतर प्रत्येकास ३० मिनिटे निरीक्षणात ठेवणार
बायोवेस्टेजचे नियोजन : तीन खोल्या लागणार, केंद्रनिहाय तयारी
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लस देण्याबाबत प्रशासनाने तयारी केली आहे. लसीकरण, बायोवेस्टेज, मोहीम दररोज पार पडल्यानंतर खोल्या सॅनिटाईज करण्यात येतील. प्रत्येकाला लस दिल्यानंतर ३० मिनिटांपर्यंत त्याला निरीक्षणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.
लसीकरणाची तारीख आताच सांगता येणार नाही. तहसीलदार, बीडीओ, आरोग्य अधिकारी, शल्य चिकित्सक यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहर व ग्रामीण मिळून जेवढे केंद्र तयार करायचे आहेत, तेवढे केंद्र तयार करण्यात येणार आहेत. खाजगी डॉक्टर्सना देखील लस घेणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लस जानेवारीनंतर आल्यास हरकत नाही; परंतु डिसेंबर अखेरीस लस प्राप्त झाल्या, तर ग्रामपंचायत निवडणुका आणि लसीकरण मोहीम एकत्र राबविण्यास तयारी करावी लागेल. डिसेंबर अखेरीस लसींचा साठा जिल्ह्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे.
लसीकरणाबाबत काही जणांमध्ये उत्सुकता आहे. काही जण साशंक आहेत, तर काही नागरिक लस घेतल्यानंतर विना मास्क फिरणे शक्य होईल काय, अशा वेगवेगळ्या विचारात आहेत.
लसीकरण केंद्र जास्तीचे लागणार
एका नागरिकास लस दिल्यानंतर ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. ३ खोल्या लसीकरण मोहिमेला लागणार आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्र जास्तीचे लागणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात गरजेनुसार तातडीने केंद्रनिर्मिती केली जाणार आहे. शास्त्रीय पध्दतीने मोहीम चालणार, बायोवेस्टेजसाठी तयारी करावी लागणार आहे, असे नियोजन प्रशासनाने केले आहे.