३ वर्षांनंतर पदाधिकारी निवड
By Admin | Updated: July 9, 2017 00:42 IST2017-07-09T00:38:46+5:302017-07-09T00:42:15+5:30
औरंगाबाद : विधानसभा, महापालिका निवडणुकीनंतर खोळंबलेल्या शिवसेना पदाधिकारी निवडीला ८ जुलै रोजी मुहूर्त लागला.

३ वर्षांनंतर पदाधिकारी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विधानसभा, महापालिका निवडणुकीनंतर खोळंबलेल्या शिवसेना पदाधिकारी निवडीला ८ जुलै रोजी मुहूर्त लागला. निवड यादी मातोश्रीवरून जाहीर करण्यात आली असून, यामध्ये पालकमंत्री रामदास कदम यांना बाजूला ठेवत खा. चंद्रकांत खैरे आणि संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांचा यादीवर प्रभाव असल्याचे दिसते आहे. १९ महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये सोशल इंजिनिअरिंगचा तोल राखण्याचा प्रयत्न झाला असला तरी काही जण नाराज झाले आहेत. त्यांनी भाजपची वाट धरण्याचा निश्चय केला आहे, तर महानगरप्रमुख या पदावर ८ जूनपासून सुरू असलेल्या नावाला सध्या पूर्णविराम मिळाला आहे.
मध्य मतदारसंघातील बाळासाहेब थोरात यांच्या जागी गोपाळ कुलकर्णी यांचे नाव निश्चित होते; परंतु ८ जूननंतर थोरात यांनी खैरे गटाकडे पारडे झुकविल्यामुळे त्यांचे पद कायम राहिल्याचे बोलले जात आहे. वाघचौरे यांना घोसाळकर यांच्या जवळीकतेचे फळ मिळाल्याची चर्चा आहे. कला ओझा आणि आऊलवार या खैरे गटाच्या मानल्या जातात. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्या जोडीला आ. भुमरे यांना देऊन त्रिवेदींचे वजन कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. मध्य मतदारसंघात शिवसेनेत उमेदवारीसाठी आतापासूनच स्पर्धा होत असल्याने पक्षाची डोकेदुखी वाढणार आहे. पूर्वमध्ये वैद्य यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत या पदनियुक्तीतून देण्यात आले आहेत. वैद्य यांनी पश्चिम शहरप्रमुख पदावरून शनिवारी रजा घेतल्याने आ. संजय शिरसाट यांना आता संघटनेकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अनिल पोलकर अडगळीला पडले होते, त्यांना प्रवाहात आणले आहे. संतोष जेजूरकर यांची उपजिल्हाप्रमुखपदी निवड करून त्यांना पक्षात कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. राष्ट्रवादीतून आलेले विश्वनाथ स्वामी यांना थेट शहरप्रमुख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षाला गळती लागलेली आहे. ती गळती रोखण्याचे मोठे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांसमोर आहे.