खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर) : येथील औरंगजेबाची कबर काढण्याच्या मुद्द्यावरून नागपूर येथे सोमवारी राडा झाल्यानंतर खुलताबादेत पोलिसांनी मंगळवारी बंदोबस्त वाढविला असून, कबरीकडे येणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. कबर बघण्यासाठी येणाऱ्यांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.
औरंगजेब प्रकरणावरून राज्यभरात मोठा गदारोळ निर्माण झाला असून, खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याचा इशारा काही हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. याच मुद्द्यावरून नागपूर येथे सोमवारी राडा झाला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी खबरदारी म्हणून खुलताबाद शहरात औरंगजेबाच्या कबर परिसरातील दर्गा परिसरात मंगळवारी चोहोबाजूंनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
यात तीन पोलिस निरीक्षक, ३० अंमलदार, एसआरपीएफचे ५० जवान, गृहरक्षक दलाचे ८० जवान यांचा समावेश आहे. शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची व व्यक्तींची पोलिस चौकशी करत आहेत. कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी केल्यानंतर पोलिस त्यांना प्रवेश देत आहेत. प्रत्येकाचे नाव, फोन नंबर, आधार कार्ड तपासले जात असून, त्याची वहीत नोंद घेतली जात आहे. विशेष म्हणजे कबरीच्या परिसरात मोबाइल नेण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे.
पर्यटकांची संख्या रोडावलीवेरूळ लेणी, खुलताबाद येथे आलेले पर्यटक औरंगजेबाची कबर बघण्यासाठी खास करून जात असत; परंतु गेल्या २० दिवसांपासून औरंगजेबाच्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या वातावरणामुळे औरंगजेबाची कबर बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे.रविवारी ७०, सोमवारी ६०, मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ९ पर्यटकांनी येथे भेट दिल्याचे पोलिसांच्या वहीत नोंदविण्यात आले आहे.