दगडफेकीनंतरचा तणाव निवळला

By Admin | Updated: January 14, 2015 00:54 IST2015-01-14T00:46:50+5:302015-01-14T00:54:20+5:30

हिंगोली : व्हॉटस्अ‍ॅपवरून आक्षेपार्ह छायचित्रे पाठवून विशिष्ट गटाकडून धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करीत १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास

After the stone-throwing stress | दगडफेकीनंतरचा तणाव निवळला

दगडफेकीनंतरचा तणाव निवळला


हिंगोली : व्हॉटस्अ‍ॅपवरून आक्षेपार्ह छायचित्रे पाठवून विशिष्ट गटाकडून धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करीत १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास जमावाने शहरातील गांधी चौक परिसरामध्ये धुडगूस घातला. यात दुकाने व वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.
सोशल नेटवर्कींगवरील नर्सी नामदेव येथे घडलेल्या या गैरप्रकाराचा निषेध करीत काही लोक एकत्र येऊन उपविभागीय पोलिस अधिकारी लांजेवार यांच्या कार्यालयाकडे निवेदन देण्यास गेले. त्याचवेळी काही मुलांचे टोळके हरण चौकात व्यापाऱ्यांना दुकाने करण्यास भाग पाडू लागले. तेथे राज बार, पिंगळकर वॉच सेंटरवर दडगफेक केली. गांधी चौकात हा जमाव पोहोचल्यानंतर गोंधळ सुरू झाला. मंगळवार हा बाजाराचा दिवस असल्याने शहरात खेड्यापाड्यातून आलेले महिला-पुरूष मोठ्या संख्येने गांधी चौक परिसरात होते. प्रचंड घोषणाबाजी सुरू झाल्याने नागरिकांची पळापळ सुरू झाली. जमावाने मोठी दुकाने बंद करण्यासाठी त्या-त्या दुकानांसमोर जाऊन घोषणाबाजी केली. संस्कृती रेडिमेडस्, आर.के.फॅशन, व्यवहारे, दुर्गा मेडिकल, फुलारी गल्लीतील रांगोळी दुकानावर दगडफेक झाल्याने दर्शनी भागातील काचा फुटल्या तसेच काऊंटरवर उभ्या असलेल्या एका महिलेस मार लागला, अशी माहिती दुकान मालक योगेश दुबे यांनी दिली. तसेच या दुकानाच्या शेजारीच असलेल्या आर.के.फॅशनच्या दुसऱ्या मजल्यावर दगडफेक झाल्याने तेथील काचा फुटून नुकसान झाले. तसेच दुकानात काम करणारे लतिफ बत्तीवाले व गणेश मुंढे हे दोघे जखमी झाल्याचे दुकानमालक अरूण किणीकर यांनी सांगितले. गांधी चौकाजवळ लावलेल्या आॅटोरिक्षाही फोडल्या. तसेच रस्त्यात काही महिला व पुरुषांनाही मारहाण करून हे टोळके पुढे गेले. मकरसंक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारात नागरिक व महिलांची मोठी गर्दी असताना भरदुपारी दगडफेकीचा प्रकार घडल्याने अफवांचे पेव फुटले आणि शहरातील इतर भागांमध्येही दुकाने बंद होण्यास सुरूवात झाली. गांधी चौक, महावीर स्तंभ, कपडा गल्ली, सराफा लाईन व जवाहर रोड भागातील दुकाने बंद झाली होती.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, शहर ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार टाक, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद खंदारे, फौजदार विवेक सोनवणे, पोना गजेंद्र बेडगे, राहुल गोटरे यांच्यासह पोलिसांचा ताफा गांधी चौक परिसरात दाखल झाला. एका दिशेने जमाव दुकाने बंद करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस उशिराने पोहोचले. तरीही काही जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. नागरिकांनीच या लोकांचा प्रतिकार करुन काही जण पकडून दिले. धुडगूस घालणाऱ्यांपैकी काहीजण नर्सी तर काही हिंगोलीतील असल्याचे सांगितले जोत.
विशेष म्हणजे तोडफोडीचा संपूर्ण प्रकार राज बारमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैैद झाला आहे. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनीही गांधी चौकात जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: After the stone-throwing stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.