मतदानानंतर प्रिंट बघायला मिळणार

By Admin | Updated: August 12, 2014 02:01 IST2014-08-12T01:39:49+5:302014-08-12T02:01:32+5:30

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रावरील बटन दाबल्यानंतर मतदारांना आपले मतदान बरोबर झाले की, नाही याची खातरजमा करता येणार आहे.

After the poll, the print will be available | मतदानानंतर प्रिंट बघायला मिळणार

मतदानानंतर प्रिंट बघायला मिळणार




औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रावरील बटन दाबल्यानंतर मतदारांना आपले मतदान बरोबर झाले की, नाही याची खातरजमा करता येणार आहे. कारण मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आता मतदान यंत्रातून त्याची प्रिंट निघणार आहे. मात्र, ही प्रिंट मतदारांना मिळणार नाही, तर ती काही वेळ दिसून लगेचच खाली ठेवलेल्या बॉक्समध्ये पडणार आहे. आयोगातर्फे राज्यात औरंगाबादसह केवळ चार जिल्ह्यांतच ही सुविधा वापरली जाणार आहे.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतही मतदान यंत्रांचा वापर होणार आहे. काही ठिकाणी आणखी आधुनिक स्वरूपाची मतदान यंत्रे वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. बऱ्याच वेळा मतदारांकडून मतदान यंत्रांबाबत तक्रारी केल्या जातात.
एक बटन दाबले तरी दुसऱ्यालाच मतदान झाले, असा आरोपही केला जातो. या पार्श्वभूमीवर आयोगाने मतदान प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवीन प्रयोग करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान यंत्रातून त्याची प्रिंट बाहेर येणार आहे. त्यामुळे मतदाराला आपले मतदान बरोबर नोंदविले गेले की, नाही हे कळू शकणार आहे. मात्र, मतदाराला ही प्रिंट मिळणार नाही. कारण हे प्रिंटर एका काचेखाली राहणार असून, त्यातून प्रिंट बाहेर निघाल्यानंतर ती सुमारे दहा सेकंद दिसू शकेल. त्यानंतर ती आपोआप खाली ठेवलेल्या डब्यात पडेल. राज्यात औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि नागपूर या चार जिल्ह्यांत हा प्रयोग राबविला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे नुकत्याच उत्तराखंड राज्यातून डेहराडून आणि हरिद्वार येथून ७ हजार मतदान यंत्रे मागविण्यात आली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्येच ही यंत्रे वापरली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले.

Web Title: After the poll, the print will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.