हजारो वृक्ष लावल्याने साताऱ्याचे उजाड, ओसाड माळरान झाले हिरवेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:34+5:302021-07-14T04:07:34+5:30
औरंगाबाद: संवेदनशील शहर म्हणून कुख्याती झालेल्या औरंगाबाद शहराला सातारा येथील भारत राखीव बटालियनमुळे (आयआरबी) एक प्रकारे सुरक्षा कडे प्राप्त ...

हजारो वृक्ष लावल्याने साताऱ्याचे उजाड, ओसाड माळरान झाले हिरवेगार
औरंगाबाद: संवेदनशील शहर म्हणून कुख्याती झालेल्या औरंगाबाद शहराला सातारा येथील भारत राखीव बटालियनमुळे (आयआरबी) एक प्रकारे सुरक्षा कडे प्राप्त झाले. या कॅम्पमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १३ वर्षात सातारा परिसरातील ओसाड माळरानावर हजारो झाडे लावली आणि जगविल्याने या परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला.
देशातील संवेदनशील शहरामध्ये औरंगाबाद गणल्या जाते. विविध दंगली या शहराने अनुभवल्या. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शहर पोलिसांना राज्य राखीव दलाची मदत घ्यावी लागते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य यांच्या सहभागातून औरंगाबाद येथील सातारा येथे भारत राखीव बटालियन हे सशस्त्र पोलीस बल उभारण्याची घोषणा २००५ साली झाली. सुमारे पावणे तीनशे एकर जमीन या दलासाठी देण्यात आली. डोंगराळ, ओसाड जमीन भारत बटालियनने ताब्यात घेतली. २००७ साली प्रथमच या बलासाठी भरती प्रक्रिया पार पडली. २०१० साली या बटालियनचे अधिकृत उद्घाटन झाले. तेव्हापासून ओसाड रानावनात वृक्ष लागवडीला सुरुवात झाली. आज तेथे वेगवेगळी तीन उद्याने आहेत. बटालियनच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य कार्यालय, निवासस्थान आणि विविध मैदान परिसरात हजारो वृक्ष लावण्यात आले आहेत. हे वृक्ष आता मोठे झाले आहेत. विशेष म्हणजे सर्व प्रकारची झाडे येथे पहायला मिळतात. वृक्ष लागवडीची दखल घेऊन शासनाने भारत बटालियनला वनश्री पुरस्काराने गौरविले आहे. शिवाय दरवर्षी नवीन वृक्ष लागवड करणे आणि लावलेली झाडे जगविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे यास प्राधान्य असते.
चौकट
पाणी टंचाईवर मात
उन्हाळ्यात बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडत असल्याचे पाहून भूजल पातळी वाढविण्यासाठी बटालियन प्रशासनाने पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा निर्धार केला. परिसरात वाल्मीचे दोन तलाव होते. या तलावाशिवाय आणखी दोन तलाव तंत्रशुद्ध पद्धतीने बांधले. या तलावात वर्षभर पाणी साचून राहते. या पाण्यामुळे परिसरातील वन्य पशु,पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली. शिवाय परिरसरातील विविध तांडे आणि वसाहतींना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. दोन वर्षापासून भारत राखीव बटालियनच्या टँकरद्वारे त्यांना मोफत पाणी पुरवठा केला जातो.
परिसरात दोन तलाव बांधले, येथील प्रत्येक इमारतीचे जलपुनर्भरण केल्याने ही वसाहत पाण्याच्या बाबतीत स्वयंभू झाली.
-मधुकर सातपुते, समादेशक, भारत राखीव बटालियन, सातारा.