पालकांच्या तक्रारीनंतर पाणीप्रश्न सोडविला
By Admin | Updated: July 6, 2014 00:15 IST2014-07-06T00:00:24+5:302014-07-06T00:15:38+5:30
गोरेगाव : येथील जिल्हा परिषद शाळेच्या बोअरवेलचे पाणी आटल्यामुळे आठ दिवसांपासून पाण्याअभावी विद्यार्थ्यांवर भटकंती करून तहान भागविण्याची वेळ आली.

पालकांच्या तक्रारीनंतर पाणीप्रश्न सोडविला
गोरेगाव : येथील जिल्हा परिषद शाळेच्या बोअरवेलचे पाणी आटल्यामुळे आठ दिवसांपासून पाण्याअभावी विद्यार्थ्यांवर भटकंती करून तहान भागविण्याची वेळ आली. पाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मुख्य रस्ता पार करावा लागत असल्याने अपघाताची शक्यता बळावल्याची तक्रार करीत पालकांनी या विरोधात आवाज उठविल्यानंतर मुख्याध्यापकांनी शनिवारी बोअरची दुरूस्ती करून घेतली.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील जि.प.शाळेतील बोअरवेलचा पाणीसाठा आटला आहे. परिणामी आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाण्याअभावी विद्यार्थ्यांना शाळेशेजारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस ठाणे, हॉटेल्स, घरे इत्यादी ठिकाणी भटकंती करत तहान भागवावी लागत आहे. पाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी शाळेसमोरील वाहनांची वर्दळ असलेला मुख्य रस्ता पार करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताची घटना घडण्याची शक्यता बळावली असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
शाळेमध्ये पाणी व्यवस्थेसाठी विद्यार्थी-पालकांनी वारंवार मागणी केली. तसेच शाळेसमोरून गेलेल्या खाजगी बोअरवेलला पाईप जोडणी करून मोफत पाणी घेण्याची पर्यायी व्यवस्था सुचविली; परंतु सदर मुख्याध्यापकाने दुर्लक्ष करीत आठ दिवसांपासून चालढकलपणा केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाण्याअभावी विद्यार्थ्यांचे हाल झाल्याने मुख्याध्यापकाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत असून शुक्रवारी पालकांनी थेट शाळा गाठली. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची त्वरित व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी मुख्याध्यापकाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच पाण्यासाठी रस्त्यावर गेलेल्या विद्यार्थ्यासोबत दुर्घटना घडल्यास मुख्याध्यापकास जबाबदार धरण्यात येईल, असेही त्यात म्हटले आहे. निवेदनावर संतोष कावरखे, जगन कावरखे, शेख अहेमद, उद्धव कांबळे, सुरेश लहुळकर, आत्माराम, सय्यद दौलत, शेख शफी, मधुकर कावरखे, शेख मुराद, माधव मखमले, मधुकर कावरखे, केशव कावरखे, गौतम कांबळे, पवन कावरखे आदींंच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबत मुख्याध्यापक आरू यांना विचारले असता, बोअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. तो लक्षात आल्यानंतर दुरूस्ती केल्याने हा प्रश्न सुटल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
जि.प.शाळेतील प्रकार
गोरेगाव येथील जि.प.शाळेतील बोअरवेलचा पाणीसाठा आटल्याचे सांगण्यात आले. परिणामी आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला.
पाण्याअभावी विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी भटकावे लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शाळेशेजारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस ठाणे, हॉटेल्स, घरे इत्यादी ठिकाणी भटकंती करत विद्यार्थ्यांना आपली तहान भागवावी लागली.
पाण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी शाळेसमोरील वाहनांची वर्दळ असलेला मुख्य रस्ता पार करावा लागत आहे.
पाण्याअभावी विद्यार्थ्यांचे हाल झाल्याने शुक्रवारी पालकांनी थेट शाळा गाठून विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची त्वरीत व्यवस्था करण्याची मागणी केली.
मुख्याध्यापकांनी तातडीने बोअरची दुरूस्ती केली असल्याचे सांगितले आहे.
बोअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा त्यांनी केला.