प्रस्ताव नामंजुरीनंतरही कामाचा विमानतळ संचालकाचा अट्टहास
By Admin | Updated: August 3, 2016 00:17 IST2016-08-03T00:06:34+5:302016-08-03T00:17:40+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा संचालक आलोक वार्ष्णेय लाच प्रकरणात सापडल्यानंतर त्याचे एक-एक चक्रावून देणारे कारनामे उघड होत आहेत

प्रस्ताव नामंजुरीनंतरही कामाचा विमानतळ संचालकाचा अट्टहास
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा संचालक आलोक वार्ष्णेय लाच प्रकरणात सापडल्यानंतर त्याचे एक-एक चक्रावून देणारे कारनामे उघड होत आहेत. विमानतळाच्या हद्दीतील तीनपैकी एक नाला भूमिगत करण्यास वरिष्ठ कार्यालयाने नकार दिला होता. परंतु त्यासाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविला. त्यामुळे हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयातच अडकला. तरीही त्याने कामाचा अट्टहास सोडला नाही. त्यासाठी थेट विमानतळाच्या तिजोरीतून ५ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी त्याने केली होती.
चिकलठाणा विमानतळाच्या हद्दीतून वाहणाऱ्या नाल्यांमुळे मोकाट कुत्र्यांची आणि पक्ष्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वेळोवेळी विमानांच्या उड्डाणात अडथळा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीमुळे वार्ष्णेय याने काही महिन्यांपूर्वी तिन्ही नाले भूमिगत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तयार केलेला प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला. हा प्रस्ताव पाठविल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून केवळ धावपट्टीजवळून वाहणारे दोन नाले भूमिगत करण्यासंदर्भात अहवाल प्राप्त झाला. मात्र आलोकने तिन्ही नाले भूमिगत करणे आवश्यक असल्याचे म्हणत नव्याने प्रस्ताव पाठविला. वरिष्ठ कार्यालयाने सर्व पडताळणी करून दोन नाले भूमिगत करण्यासंदर्भात अहवाल पाठविला. असे असतानाही तिन्ही नाले भूमिगत झाले पाहिजेत, असा पवित्रा वार्ष्णेयने घेतला होता.
नाले भूमिगत करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पाठविलेला प्रस्ताव अखेरीस वरिष्ठ कार्यालयात अडकला. याविषयी वरिष्ठ कार्यालयाकडून काहीही निर्णय होत नसल्याने हे तिन्ही नाले विमानतळाच्या खर्चातून भूमिगत करण्याची तयारी आलोकने सुरू केली होती.